मुंबईत फटाके फोडण्यास बंदी; पालिकेनं दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क.

मुंबई डेस्क :- दिवाळीनिमित्त होणारी गर्दी आणि प्रदुषणामुळं करोनाचे संकट अधिक गहिरे होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं फटाके फोडण्याबाबत नियमावली जारी केली. त्यानुसार महापालिका क्षेत्रात फटाके फोडण्यास किंवा आतिषबाजी करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

दिवाळी तोंडावर आल्याने मुंबईच्या रस्त्यांवर, बाजारांमध्ये खरेदीसाठी लोकांची गर्दी होत आहे. मास्क न घालणे, सामाजिक वावर न पाळणे असे नियमभंग सुरू आहेत. मुंबईच्या रस्त्यांवरील गर्दी पाहता मुंबई महापालिकेनं आज तातडीने नियमावली जारी केली आहे. तसंच, भाऊबिजेच्या दिवशी बहिणीने भावाला ओवाळताना शक्य असल्यास ऑनलाइन माध्यमांचा वापर करावा, असंही पालिकेनं नमूद केलं आहे.

दरम्यान, करोनाच्या अनुषंगाने हात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारे सॅनिटायजर हे ज्वलनशील असण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेऊन दिवाळीचे दिवे लावताना, मर्यादित स्वरुपात आतशबाजी करताना आणि फटाके फोडताना हाताला सॅनिटायजर लावलेले नसल्याची खात्री करुन घ्यावी. सदर प्रसंगी सॅनिटायजरच्या संपर्कात येणे टाळावे किंवा सॅनिटायजरचा वापर करु नये. तसेच सॅनिटायजरची बाटली अगर कुपी आपल्याजवळ बाळगू नये, अशा सूचनाही पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

फटाके फोडण्याबाबत सूचना.

कोविड – १९’ बाधित रुग्णांमध्ये श्वसनाचा मुख्य प्रश्न असतो आणि त्यांची ऑक्सिजन पातळी खालावण्याची शक्यता असते; हे लक्षात घेऊन आणि फटाक्यांच्या धुराचा कोविड रुग्णांना त्रास होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक परिसर, खासगी परिसर इत्यादी सर्व ठिकाणी कोणत्याही प्रकारचे फटाके फोडता येणार नाहीत किंवा तत्सम स्वरुपाची आतशबाजी महानगरपालिका क्षेत्रात कुठेही करता येणार नाही. केवळ लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी खासगी परिसरांमध्ये फुलझडी, अनार फोडण्यास अनुमती.