आयटीआयमध्ये ‘महिंद्रा स्किल डेव्हलपमेंट सेंटर’

पंतप्रधान मोदींकडून अल्पमुदतीच्या कौशल्य अभ्यासक्रमांना शुभारंभ....

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ११ :“कौशल्य, संधी आणि स्वावलंबनाचा नवा अध्याय आता गडचिरोलीत सुरू झाला आहे.”

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ८ ऑक्टोबर रोजी आभासी पद्धतीने देशभरातील अल्पमुदतीच्या रोजगारक्षम कौशल्य अभ्यासक्रमांचे उद्घाटन केले. या राष्ट्रीय उपक्रमाचा भाग म्हणून गडचिरोली येथील क्रांतीवीर बाबुराव शेडमाके शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) ‘महिंद्रा ट्रॅक्टर स्किल डेव्हलपमेंट सेंटर’चा शुभारंभ करण्यात आला.

या प्रसंगी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्वकर्मा प्रतिनिधी अतुल राचमलवार यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन पार पडले. जिल्हाधिकारी पंडा म्हणाले, “रोजगारक्षमतेसाठी तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण आजच्या काळाची मूलभूत गरज आहे. आयटीआय गडचिरोलीमधील नव्या केंद्राद्वारे स्थानिक युवकांनी संधी साधावी,” असे त्यांनी आवाहन केले.

‘महिंद्रा अँड महिंद्रा’ आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त सहकार्याने हे अत्याधुनिक केंद्र स्थापन करण्यात आले आहे. येथे आधुनिक प्रयोगशाळा, कुशल प्रशिक्षक, तसेच प्रशिक्षणार्थ्यांसाठी मोफत निवास व भोजनाची सोय करण्यात आली आहे. ३० प्रशिक्षणार्थ्यांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण आजपासून सुरू झाले आहे.

केंद्रात ‘महिंद्रा ट्रॅक्टर सर्व्हिसिंग व मेंटेनन्स’ या विषयासह अल्पमुदतीचे अन्य अभ्यासक्रमही सुरु करण्यात आले आहेत — सेल्फ एम्प्लॉएड टेलर (महिलांसाठी), ब्युटी थेरपिस्ट, डाटा एन्ट्री ऑपरेटर, ड्रायव्हर ट्रेनर, फ्रीज व एसी टेक्नीशियन, एलईडी लाईट रिपेअरिंग, टू व्हिलर सर्व्हिस असिस्टंट आणि आर्क वेल्डिंग असिस्टंट.

प्राचार्य सुरेश चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणातून जिल्ह्यातील युवकांना प्रशिक्षणाचा लाभ घेऊन रोजगार व उद्योजकतेकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. सहायक आयुक्त योगेंद्र शेंडे यांनी कौशल्य विभागाच्या उपक्रमांची माहिती दिली, तर गटनिदेशक श्रीधर बावनकर यांनी पंतप्रधानांच्या ‘वोकल फॉर लोकल स्किल’ या दृष्टीकोनावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विपीन मेश्राम यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. मनिष किरपाल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेश बोरकर, एन. डी. मेश्राम, तुषार कोडापे, मुरारी घाटुरकर, सतिशचंद्र भरडकर, ए. यू. येडे आणि सर्व कर्मचारी वर्गाचे विशेष सहकार्य लाभले.

या केंद्रामुळे जिल्ह्यातील तरुणांना तांत्रिक प्रशिक्षण, औद्योगिक अनुभव आणि प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी मिळणार आहेत — ‘कौशल्यातून स्वावलंबन’ या मंत्राचा प्रत्यक्ष अविष्कार गडचिरोलीत आकार घेताना दिसत आहे.

Comments (0)
Add Comment