लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली-छत्तीसगड सीमेलगतच्या घनदाट जंगल परिसरात सुरक्षा दलांनी राबविलेल्या व्यापक नक्षलविरोधी मोहिमेत एका पुरुष माओवाद्याचा खात्मा करण्यात यश आले असून घटनास्थळावरून अत्याधुनिक शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. मात्र, माओवाद्यांनी केलेल्या जोरदार गोळीबारात सी-६० पथकातील एक जवान जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ३ फेब्रुवारीच्या संध्याकाळी कंपनी क्रमांक १० चे उर्वरित माओवादी सदस्य तसेच छत्तीसगडमधील अज्ञात माओवादी दलमच्या हालचालींबाबत सुरक्षा यंत्रणेला विश्वसनीय माहिती प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात त्याच रात्री १४ सी-६० पथकांसह मौजा फोदेवाडा गावापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या नारायणपूर–गडचिरोली जिल्हा सीमेवरील जंगल भागात व्यापक शोधमोहीम सुरू करण्यात आली.
दरम्यान, काल दिवसा सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये काही काळ चकमक झाली. या चकमकीदरम्यान सुरक्षा दलाने माओवाद्यांचे दोन तळ उद्ध्वस्त करण्यात यश मिळविले. तसेच घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात माओवादी साहित्य जप्त करण्यात आले. मात्र, परिसरातील अत्यंत प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, डोंगराळ भाग आणि घनदाट जंगलामुळे माओवाद्यांचा अचूक मागोवा घेणे कठीण ठरले.
आज सकाळी अभियान अधिक तीव्र करत अतिरिक्त चार सी-६० पथके तसेच केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) क्यूएटीचे एक पथक घटनास्थळी पाठविण्यात आले. सकाळपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेदरम्यान माओवाद्यांशी अधूनमधून चकमकी होत आहेत. या कारवाईदरम्यान एका पुरुष माओवाद्याचा मृतदेह हस्तगत करण्यात सुरक्षा दलाला यश आले असून त्याच्याकडून एक एके-४७ रायफल आणि एक एसएलआर रायफल अशी दोन अत्याधुनिक अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. संबंधित माओवादीची ओळख अद्याप पटलेली नसून आणखी काही माओवादी जखमी किंवा ठार झाल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्याबाबत पडताळणी सुरू आहे.
दरम्यान, आज संध्याकाळी उशिरा माओवाद्यांनी सुरक्षा दलावर जोरदार गोळीबार केला. या गोळीबारात सी-६० पथकातील एक जवान गोळी लागून जखमी झाला असून त्याला तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवून पुढील वैद्यकीय उपचारासाठी बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सध्या सदर सीमावर्ती जंगल परिसरात सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू असून संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मोहिम पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली पोलीस दलाकडून अधिकृत आणि सविस्तर माहिती जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.