भुसुरुंगस्फोटात सहभागी, सहा लाखांचे बक्षिसधारक माओवादी ‘उपकमांडर’ कवंडे जंगलात अटक.

गडचिरोली पोलिसांचे नक्षलविरोधी अभियान ठरतेय निर्णायक; २०१९च्या जांभूळखेडा घटनेतील प्रमुख सूत्रधार जेरबंद..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, २८ जून : गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलप्रवण जंगलांमध्ये सुरक्षादलांच्या सातत्यपूर्ण मोहिमांना यश येताना दिसत आहे. कवंडे जंगल परिसरात घातपाताच्या तयारीत असलेल्या आणि १५ जवानांच्या भुसुरुंगस्फोटातील मुख्य सूत्रधार असलेल्या जहाल माओवादी उपकमांडरला गडचिरोली पोलिसांनी सीआरपीएफच्या सहकार्याने काल रात्री शिताफीने अटक केली. महाराष्ट्र शासनाने ज्याच्या अटकेवर सहा लाखांचे बक्षीस जाहीर केले होते, तो ‘अंकल उर्फ मन्नू सुलगे पल्लो’ (२८), रा. कवंडे, ता. भामरागड, जि. गडचिरोली — अखेर पोलिसांच्या जाळ्यात सापडला.

काल दिनांक २७ जून रोजी कवंडे जंगल परिसरात सुरू असलेल्या संयुक्त नक्षलविरोधी मोहिमेदरम्यान संशयास्पद हालचाली करणाऱ्या इसमाला ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशीनंतर त्याची ओळख माओवादी उपकमांडर म्हणून पटली. २०१९ मध्ये कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा परिसरात झालेल्या भयंकर भुसुरुंगस्फोटात या माओवादीचा सक्रिय सहभाग होता, ज्यात १५ पोलीस जवान शहीद झाले होते. याशिवाय त्याच्यावर ३ चकमकी व २ खुनांसह एकूण ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला २९ मार्च २०२१ रोजी खोब्रामेंढा जंगलात झालेल्या चकमकीसंदर्भातील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, कुरखेडा यांनी त्यास ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अंकल उर्फ मन्नू सुलगे याचा माओवादी प्रवास २०१२ मध्ये छत्तीसगडच्या निब कंपनीत सदस्य पदावर भरतीने सुरू झाला. नंतर २०१७ मध्ये तो भामरागड दलममध्ये आणि त्यानंतर कोरची दलममध्ये उपकमांडर म्हणून कार्यरत राहिला. २०२० पासून तो महाराष्ट्र–छत्तीसगड सीमावर्ती जंगलांमध्ये लपून सुरक्षा दलांच्या हालचालींची रेकी करत होता. राज्य शासनाने त्याच्यावर सहा लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

ही यशस्वी कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, ३७ बटालियन सीआरपीएफचे कमांडंट दाओ इंजिरकान कींडो, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश व सत्य साई कार्तिक, पोलीस उपअधीक्षक विशाल नागरगोजे, तसेच भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते व कुरखेड्याचे उपविभागीय अधिकारी रवींद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कवंडे पोलीस ठाण्याचे प्रभारी पोउपनि. मंदार शिंदे, विशेष अभियान पथक व सीआरपीएफच्या सी-कंपनीच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या पार पाडली.

या अटकेनंतर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी कवंडे जंगल परिसरात माओवादविरोधी मोहीम अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. तसेच माओवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ही कारवाई केवळ एका माओवादीला अटक करण्यात यशस्वी ठरली नाही, तर गेल्या काही वर्षांतील भयंकर घटनेच्या सूत्रधाराला पकडत पोलिसांनी गडचिरोलीतील माओवादी नेटवर्कवर आणखी एक मोठा आघात केला आहे.

Gadchiroli CRPFnaxal surrender