लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि,१४ : पोलीस दलामार्फत ‘प्रोजेक्ट उडान’ अंतर्गत आणि पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून प्रेरणादायी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तकेंद्र, गडचिरोली आणि उप-जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र, अहेरी यांच्या सहकार्याने पोलीस मुख्यालय गडचिरोली, उपमुख्यालय प्राणहिता आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सिरोंचा येथे हे शिबिर संपन्न झाले.
विशेष बाब म्हणजे, यावर्षी पहिल्यांदाच आत्मसमर्पित माओवादी सदस्यांनी देखील या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक ऐक्याचा आणि परिवर्तनशील विचारसरणीचा संदेश दिला. एकूण ३३० रक्तदात्यांनी “रक्तदान हेच श्रेष्ठदान” या मूल्याला प्रतिसाद देत रक्तदान करून समाजाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.
या शिबिरांमध्ये पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) सत्य साई कार्तिक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, पोलीस उप-अधीक्षक विशाल नागरगोजे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज जगताप आणि पोलीस रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिल मडावी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या प्रसंगी बोलताना सांगितले की, गडचिरोली पोलीस दलामार्फत मागील वर्षभरात विविध शिबिरांद्वारे जवळपास २८०० युनिट रक्त संकलित करण्यात आले आहे. रक्तदान ही सामाजिक कर्तव्याची प्रतिकृती असून, प्रत्येकाने दर तीन महिन्यांनी एकदा रक्तदान करून समाजाच्या ऋणात आपला वाटा उचलावा, असे त्यांनी आवाहन केले. याप्रसंगी रक्तदान करणाऱ्या पोलीस अधिकारी, अंमलदार, नागरिक व आत्मसमर्पित माओवादी सदस्य यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले. प्राणहिता उपमुख्यालयातील शिबिरात अहेरी, भामरागड, एटापल्ली, हेडरी परिसरातील पोलीस आणि नागरिकांचा मोठा सहभाग नोंदविण्यात आला.
अहेरी येथील शिबिराचे उद्घाटन उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या उपस्थितीत झाले. तसेच सिरोंचा येथील शिबिरात उपविभागीय अधिकारी संदेश नाईक, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतना वरठी, डॉ. करिष्मा नान्ने, डॉ. ब्राम्हानंद पुंगाटी आणि डॉ. आदित्य सपकाळ यांच्यासह स्थानिक पोलीस अधिकारी आणि आरोग्यसेवक सहभागी झाले. या संपूर्ण उपक्रमाच्या यशस्वीतामध्ये जनसंपर्क शाखा, पोलिस कल्याण शाखा, नागरी कृती शाखा, विविध पोलीस ठाणी, उपठाणी आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकांनी मोलाचे योगदान दिले.