लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
कल्याणमध्ये जे घडलं त्यावर तिथले खासदार, आमदार हे व्यक्त होत नाहीत किंवा मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून पाठपुरावा करत नाहीत, हे का घडतं ? कारण याच नाही एकूणच सर्व आमदार खासदारांनी मराठी जनतेला पुरतं ओळखलं आहे. यांना थोडीफार आमिषं दाखवा की हे करतात मतदान आम्हाला ! मी गेली अनेक वर्ष जे नेहमी तुम्हाला सांगतोय की या सर्वांनी तुम्हाला गृहीत धरलं आहे.
आणि अशी घटना घडली की सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दरवाजे ठोठवावेसे वाटतात, कारण तेंव्हा खात्री असते की इतर पक्ष तुमच्या मदतीला धावून येणार नाहीत. मात्र मतदानाच्या वेळेला मात्र हाच मराठी माणूस इतर पक्षांच्या दरवाजावर जाऊन टकटक करतो !– राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मुंबई : हिंदी भाषिक अधिकाऱ्याने गुंडांकडून मारहाण केल्याची संतापजनक घटना कल्याणमधील एका मराठी कुटुंबातून समोर आली आहे.पिडीत मराठी कुटुंबीयांची फिर्याद घेण्याऐवजी संबंधित शुक्ला नामक अधिकाऱ्याची खातरदारी करण्यात आल्याचा आरोपही मराठी कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, माध्यमांमध्ये बातमी आल्यानंतर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा प्रचंड गाजला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला आहे. तसेच, माजोरड्या अखिलेश शुक्ला यांना तात्काळा प्रभावाने निलंबित करण्यात आल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे.अशातच आता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियातून संताप व्यक्त करीत संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली असल्याने मराठी माणसात न्याय मिळण्याची भावना जागृत झाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट इशारा दिला आहे.
कल्याण येथील सोसायटीमध्ये मराठी माणसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून दोषींवर गुन्हा दाखल करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. मुंबई ही मराठी माणसांची आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. कल्याणमधील एका सोसायटीत मराठी कुटुंबावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी विधानपरिषद सदस्य ऍड. अनिल परब यांनी मांडलेल्या विधानपरिषद नियम 289 अन्वये चर्चेला मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिले. या चर्चेत विधानपरिषद सदस्य सर्वश्री ऍड. परब, शशिकांत शिंदे, अरुण उर्फ भाई जगताप, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.
राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट
कल्याणमध्ये एका मुजोर अमराठी माणसाने मराठी माणसाला, मराठीपणावरून अर्वाच्य शिव्या देत, जबर मारहाण केली. अशीच मुजोरी काही दिवसांपूर्वी गिरगावमध्ये एका अमराठी माणसाने दाखवली. तिकडे त्याला महाराष्ट्र सैनिकांनी जागच्या जागी प्रसाद दिला. कालच्या प्रकरणानंतर पण माझे महाराष्ट्र सैनिक कल्याणमध्ये प्रसाद द्यायला गेले होते. कल्याणच्या घटनेत कोणीतरी गुप्ता नावाचा माणूस होता, महाराष्ट्रात असे अनेक महाराष्ट्रद्वेषी गुप्ता, गुप्तपणे राहत आहेत. मध्यंतरी गिरगावमध्ये घडलेली घटना असो की ही कल्याणमधली, प्रत्येकवेळेला हे असले महाराष्ट्रद्वेषी मराठी माणसाचा कणा तपासून बघत असतात आणि अजून किती तुम्हाला वाकवता येईल हे बघत असतात. बरं असं पण नाही की महाराष्ट्रा बाहेरून इथे आलेले सगळेच महाराष्ट्रद्वेषी आहेत. आज कित्येक पिढ्या इथल्या मातीत मिसळून राहिलेले असंख्य अमराठी माणसं आहेतच. पण ही जी महाराष्ट्रद्वेषींची नवीन पिलावळ इथे गेले काही वर्ष वळवळायाला लागली आहे, ज्यांचा डोळा इथल्या जमिनीवर आहे, त्यांना वेळीच ठेचलं पाहिजे. मराठी माणसा आता तरी जागा हो, अन्यथा हे तुमच्या पायाखालची जमीन कधी खेचतील आणि कधी तुम्ही नेस्तनाबूत व्हाल हे समजणार पण नाही !