जिवंत विद्युत ताराला स्पर्श झाल्याने विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू..

भंडारा जिल्हातील कनेरी दगडीतील घटना..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

भंडारा : लाखनी तालुक्यातील कनेरी-दगडी गावात घरातील टिनाच्या शेडमध्ये साफसफाई करताना विजेच्या जोरदार धक्क्याने एका विवाहितेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. पूजा प्रदीप सूर्यवंशी (३६) असे मृत महिलेचे नाव असून त्या सकाळच्या सुमारास घराबाहेरील टिनशेडखाली असलेल्या कुलर आणि विजेच्या मीटरजवळील जाळं हटवत होत्या, याचवेळी अचानक त्यांना विद्युत करंट लागला. जोरदार धक्का बसल्याने त्या जागीच बेशुद्ध पडल्या. नातेवाईकांनी त्यांना तातडीने लाखनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

लाखनी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. घरातील जबाबदारी सांभाळणारी स्त्री एका क्षणात हरपल्याने कुटुंबीय शोकाकुल झाले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेवरून घरातील विजेच्या वायरिंग, कुलरजवळील असुरक्षित उपकरणे, आणि टिनशेडमधील विजेच्या मोकळ्या संपर्कांबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. ही घटना घराघरात सतर्कतेचा इशारा देऊन गेली आहे. विजेची उपकरणे आणि वायरिंगची हाताळणी करताना किती काळजी घ्यावी लागते, हे या घटनेतून ठळकपणे समोर आले आहे.

Electric shock death