लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) सरळसेवा भरती २०२३ अंतर्गत गट अ, ब आणि क संवर्गातील पदांसाठीच्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक अखेर जाहीर करण्यात आले आहे. काही संवर्गातील परीक्षा पूर्वी घेण्यात आल्या असल्या तरी, सुधारित आरक्षण निकषांमुळे उर्वरित पदांसाठीच्या परीक्षांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. आता या परीक्षा जुलै ते ऑगस्ट २०२५ दरम्यान होणार आहेत.
एमआयडीसीने १४ ऑगस्ट २०२३ रोजी सरळसेवेअंतर्गत ३४ रिक्त पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानुसार २ ते २५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले. त्यानंतर ११ संवर्गासाठीची ऑनलाइन परीक्षा ३० मार्च ते ३ एप्रिल २०२४ या दरम्यान घेण्यात आली.
मात्र, राज्य शासनाने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय (SEBC) उमेदवारांना दिलेल्या नवीन आरक्षण धोरणामुळे, उर्वरित २३ संवर्गांच्या परीक्षांचे वेळापत्रक पुन्हा ठरवण्याची गरज भासली. यामध्ये लघुलेखक (निम्न श्रेणी), लघु टंकलेखक, वरिष्ठ लेखापाल, लेखा अधिकारी आदी पदांचा समावेश आहे.
नवीन वेळापत्रकानुसार, या पदांसाठीची परीक्षा आता पुढीलप्रमाणे घेतली जाणार आहे –
👉 १० जुलै २०२५,
👉 ६ ऑगस्ट २०२५,
👉 ८ ते १० ऑगस्ट २०२५ दरम्यान विविध सत्रांमध्ये परीक्षा पार पडणार आहेत.
महत्त्वाचे म्हणजे, परीक्षा संबंधित अधिकृत माहिती आणि अद्ययावत वेळापत्रक एमआयडीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.midcindia.org) उपलब्ध आहे. उमेदवारांना वेळोवेळी संकेतस्थळ तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.