लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि.४ : एटापल्ली तालुक्यातील आलदंडी टोला येथे घडलेल्या माता मृत्यू प्रकरणाबाबत काही माध्यमांतून प्रसारित झालेल्या अप्रामाणिक व दिशाभूल करणाऱ्या वृत्तांवर जिल्हा प्रशासनाने सविस्तर स्पष्टीकरण देत वस्तुस्थिती जनतेसमोर मांडली आहे. “रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने गरोदर मातेला सहा किलोमीटर पायी चालत जावे लागले आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला” हा दावा पूर्णतः चुकीचा, निराधार व तथ्यहीन असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी तोडसा परिसरात प्रत्यक्ष भेट देऊन घटनास्थळी पाहणी केली. स्थानिक नागरिक, आरोग्य यंत्रणा, आशा स्वयंसेविका तसेच संबंधित घटकांशी सविस्तर चर्चा करून वस्तुस्थितीची खातरजमा करण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, संबंधित गरोदर माता रुग्णवाहिकेअभावी किंवा उपचारासाठी पायी चालत गेली होती, ही माहिती पूर्णतः चुकीची आहे. प्रत्यक्षात, सदर महिला उपचारासाठी शासकीय आरोग्य यंत्रणेकडे न जाता आलदंडी टोला येथून पेठा येथे एका पुजाऱ्याकडे गेली होती, जिथे तिने रात्री मुक्काम केला होता. दरम्यान, रात्री एक ते दोन वाजताच्या सुमारास तिची प्रकृती अचानक खालावली.
परिस्थिती गंभीर झाल्याचे लक्षात येताच स्थानिक आशा स्वयंसेविकेला तात्काळ संपर्क करण्यात आला. आशा स्वयंसेविकेने कोणताही विलंब न करता तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली आणि गरोदर मातेला हेडरी येथील लॉईड्स कालीअम्मा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे “सहा किलोमीटर पायी चालल्यामुळे मृत्यू झाला” हा दावा वास्तवाशी कोणताही संबंध नसलेला असल्याचे डॉ. शिंदे यांनी ठामपणे स्पष्ट केले.
तसेच, संबंधित महिलेच्या संपूर्ण गरोदरपणाच्या कालावधीत आरोग्य विभागामार्फत नियमित गृहभेटी, तपासण्या व मार्गदर्शन देण्यात आले होते. आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी भेट देऊन तिच्या आरोग्यस्थितीचे निरीक्षण केले असल्याची नोंद प्रशासनाकडे उपलब्ध आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनीही घटनास्थळी पाहणी करून सांगितले की, ग्रामीण व दुर्गम भागातील माता व बालमृत्यू प्रकरणांबाबत प्रशासन अत्यंत संवेदनशील असून प्रत्येक घटनेची सखोल चौकशी केली जाते. या प्रकरणात आरोग्य यंत्रणेकडून आवश्यक ती सेवा वेळेत पुरविण्यात आली असून प्रशासनाकडून कोणताही हलगर्जीपणा झाल्याचे आढळून आलेले नाही.
यावेळी त्यांनी नागरिकांना अत्यंत महत्त्वाचे आणि कळकळीचे आवाहन करत स्पष्ट केले की,गरोदर माता किंवा गंभीर आजाराच्या परिस्थितीत पुजारी, वैदू, अंधश्रद्धा किंवा अप्रामाणिक उपचारांकडे न जाता थेट शासकीय आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. प्राथमिक आरोग्य केंद्र, आशा स्वयंसेविका किंवा रुग्णवाहिका सेवा यांचा वेळीच उपयोग केल्यास अनेक अमूल्य जीव वाचू शकतात, असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
या प्रकरणात पुजाऱ्याकडे जाणे, तेथे रात्री मुक्काम करणे आणि त्यानंतर अचानक प्रकृती बिघडणे ही घटना तपासणीअंती स्पष्ट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी तसेच माध्यमांनी अपूर्ण माहितीच्या आधारे निष्कर्ष काढू नयेत, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग मातृ व बाल आरोग्य सुरक्षेसाठी कटिबद्ध असून, दुर्गम भागातही रुग्णवाहिका सेवा, आशा स्वयंसेविका व प्राथमिक आरोग्य यंत्रणा २४ तास कार्यरत असल्याचे यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आले.