आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी विधानसभा क्षेत्रातील विज समस्या सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशनात उर्जा मंत्री नितीन राऊत यांना निवेदनाद्वारे घातले साकडे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. 20 डिसेंबर: दि. 14 व 15 डीसेंबर 2020 रोजी मुंबई येथे आयोजित विधानसभा अधिवेशनात आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे उर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे मतदार संघातील विज समस्या सोडविण्याची विनंती केली. प्रामुख्याने कुरखेडा व कोरची तालुक्यात लांब अंतरावरील लाखांदूर येथील 132 केव्ही उपकेंद्रातुन पुरेशा दाबाने शाश्वत विज पुरवठा होत नसल्याने दोन्ही तालुक्यात मोठ्या प्रमाणात विज समस्या निर्माण झाली आहे याकरिता कुरखेडा जि. गडचिरोली येथे नविन 132 उपकेंद्र तयार करण्याची मागणी केली असता मा. उर्जा मंत्री यांनी संचालक ( संचालन) महावितरण यांना उचीत कार्यवाही करण्याचे लेखी निर्देश दिले.

आरमोरी मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात मुख्य पिक धानाला सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते पाणी उपलब्ध आहे परंतु पुरेशी विज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना धान पिकाचे ओलीत करतांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागुन सिंचना अभावी पिक करपुन शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास आणून देत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी पंपाकरीता नियमित २४ तास वीज पुरवठा करण्यात यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली त्यावर मंत्री महोदयांनी संबंधित अधिकाऱ्यांना तपासून कार्यवाही करण्याचे लेखी निर्देश दिले.

तसेच कोरोणा महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लाकडाऊनच्या काळात घरगुती विज ग्राहकांना महावितरण कडुन मोठ्या प्रमाणात विज देयके पाठविण्यात आली असून नागरिकांना दिलासा देण्यासाठी सदर विज बीले माफ करण्याची मागणी सुद्धा करण्यात आली. आमदार कृष्णा गजबे यांनी केलेल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून ऊर्जा मंत्री महोदयांनी सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.