गडचिरोली जिल्हयातील कोरची या तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर.

गडचिरोली, दि. 09 डिसेंबर : राज्यातील तालुक्यांमध्ये जुन ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तुट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखाली क्षेत्र व पिकाची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासनाने गडचिरोली जिल्हयातील कोरची या तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर केला आहे.

दुष्काळ घोषित करण्यात येत असलेल्या कोरची तालुक्यामध्ये पुढीलप्रमाणे सवलती लागु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. जमीन महसुलात सुट, पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5% टक्के सुट, शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे इ. सवलती लागू होणार आहेत.

अकरा तालुक्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ
दुष्काळ सद्दश्य परिस्थिती तसेच ”क्यार” व ”महा” चक्रिवादळामुळे आलेल्या अवेळी पावसाने नुकसान झालेल्या एटापल्ली वगळता सर्व तालुक्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क माफ करण्या बाबत सवलती लागु करण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे.