विहिरीच्या कामाचा पैसा ‘गायब’! ग्रामसेवकावर अफरातफरचा ठपका—ठेकेदाराला मोबदला नाकारला?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

अहेरी : ग्रामपंचायत स्तरावर विकासकामांच्या निधीच्या वापराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना अहेरी तालुक्यात समोर आली आहे. पेठा ग्रामपंचायत अंतर्गत मोजा येल्लाराम येथे विहिरीच्या प्लॅटफॉर्म व ओटा बांधकामासाठी मंजूर निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप होत असून, तत्कालीन ग्रामसेवकावर थेट अफरातफर आणि फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सदर प्रकरणात स्थानिक रहिवासी तसेच ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई कांबळे यांनी पुढाकार घेत पंचायत समिती अहेरीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. दोन वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या विहिरीच्या प्लॅटफॉर्म बांधकामासाठी सुमारे दीड लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली होती. काम पूर्ण झाल्यानंतर ग्रामसेवक फिरोज कुमरे यांनी मोजमाप पुस्तिका (एमबी) व पूर्णता प्रमाणपत्र (सीसी) सादर करून बिलाची प्रक्रिया पूर्ण केली.

मात्र, यानंतर घडलेल्या आर्थिक व्यवहारांवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उपलब्ध माहितीनुसार, साहित्य खर्च म्हणून सुमारे ८१ हजार रुपये आर्या एजन्सी, आलापल्ली यांना अदा करण्यात आले. तसेच पाच मजुरांपैकी चार मजुरांचे वेतन काढण्यात आले; मात्र एका मजुराचा मोबदला थकवण्यात आल्याचा आरोप आहे.

या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे, एजन्सीला दिलेली रक्कम पुन्हा परत घेऊन ती संबंधित ग्रामसेवकाकडे दिल्याचे एजन्सीच्या मालकांनी सांगितल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. याबाबत सध्याचे ग्रामसेवक नरोटे यांनी प्राथमिक पडताळणी केली असता, व्यवहारातील अनियमिततेची शक्यता असल्याचे समोर आल्याचेही सांगितले जाते.

यामुळे प्रत्यक्ष काम करणाऱ्या ठेकेदाराला मोबदला न मिळाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. “काम पूर्ण करूनही पैसे न मिळणे, आणि मंजूर निधीचा परस्पर व्यवहार होणे, ही सरळसरळ फसवणूक आहे,” असा आरोप पुष्पाताई कांबळे यांनी केला आहे.

या प्रकरणामुळे ग्रामपंचायत पातळीवरील निधी व्यवस्थापन, पारदर्शकता आणि जबाबदारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. विकासकामांच्या नावाखाली निधीचा अपहार होत असेल, तर याचा थेट फटका गावकऱ्यांच्या विश्वासाला बसतो.

तक्रारदारांनी पंचायत समिती अहेरीचे गटविकास अधिकारी (BDO) यांच्याकडे सविस्तर निवेदन देत संबंधित ग्रामसेवकावर तातडीने कारवाई करण्याची तसेच ठेकेदाराला प्रलंबित रक्कम तत्काळ अदा करण्याची मागणी केली आहे…

जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोलीजिल्हाधिकारी गडचिरोलीपोलीस स्टेशन अहेरीमुख्य कार्यकारी अधिकारी गडचिरोलीसंवर्ग संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती अहेरी
Comments (0)
Add Comment