पावसाळा आला, जड वाहतूक वळवली! सिरोंचा–आलापल्ली व कुरखेडा–कोरची मार्ग बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग ठरवले, नियम तोडल्यास कठोर कारवाईची चेतावणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. ३० : जिल्ह्यातील काही राष्ट्रीय महामार्गांवरील अपूर्ण कामे, नदीपात्रात पाणी साचण्याची शक्यता आणि पावसाळ्यामुळे निर्माण होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. सिरोंचा–आलापल्ली आणि कुरखेडा–कोरची या दोन प्रमुख मार्गांवरील वाहतूक ५ आणि ४ जूनपासून अनुक्रमे बंद करण्यात येणार असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिले आहेत.

सिरोंचा–आलापल्ली मार्ग बंद :

राष्ट्रीय महामार्ग क्र. 353-C वरील सिरोंचा–आलापल्ली मार्ग पावसाळ्यात जड वाहनांसाठी अत्यंत धोकादायक असल्याने ५ जूनच्या मध्यरात्रीपासून ते ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहने आता मंचेरियाल–राजुरा–बल्लारशाह–चंद्रपूर–गडचिरोली या पर्यायी मार्गाने धावतील. आपत्कालीन सेवांशी संबंधित वाहने मात्र वगळण्यात आली आहेत.

🌉 कुरखेडा–कोरची मार्गही बंद :

राष्ट्रीय महामार्ग क्र. 543 वरील कुरखेडा–कोरची मार्गावरील सती नदीवरील जुन्या पुलाजवळ नव्या पुलाचे काम सुरू आहे. येथील वळण रस्ता पावसात पाण्याखाली जाण्याची शक्यता असल्याने ४ जूनपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत वाहतूक बंद राहील.

हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग: कुरखेडा–आंधळी फाटा–वाघेडा–मालदुगी–गोठणगाव फाटा आणि कुरखेडा–तळेगाव–खेडेगाव–अंतरगाव–पुराडा.

जड वाहनांसाठी पर्यायी मार्ग: कुरखेडा–वडसा–आरमोरी–वैरागड–गोठणगाव फाटा.

🚓 पोलीस–प्रशासन सज्ज, नियम तोडल्यास कारवाई..

या निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी तहसिलदार, पोलीस व परिवहन विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मार्गदर्शक फलक तीन भाषांमध्ये लावले जातील, तर पोलीस विभागाकडून वाहतूक नियंत्रणासाठी मनुष्यबळ आणि बॅरेकेडींगची व्यवस्था केली जाणार आहे.

आठवड्याला संयुक्त अहवाल सादर करणे अनिवार्य असून, मोटार वाहन कायदा, भारतीय दंडसंहिता, पोलीस अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार आहे.

जिल्हा प्रशासनाने वाहनचालक, ट्रान्सपोर्टर्स आणि नागरिकांनी या आदेशांचे काटेकोर पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे स्पष्ट आवाहन केले आहे.