लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दलाने ‘प्रोजेक्ट उडान’ या उपक्रमांतर्गत आयोजित केलेले भव्य रक्तदान शिबिर केवळ एक कार्यक्रम न राहता, समाजोपयोगी संवेदनशीलतेचे ठळक प्रतीक ठरले. दिनांक ८ जानेवारी रोजी पार पडलेल्या या शिबिरात संपूर्ण जिल्ह्यातून १२०० हून अधिक पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार तसेच नागरिकांनी स्वेच्छेने रक्तदान करून मानवी जीवनरक्षणासाठी आपली जबाबदारी निभावली.
मानवी रक्ताला कोणताही पर्याय उपलब्ध नाही, ही वस्तुस्थिती या उपक्रमातून अधोरेखित झाली. आपत्कालीन उपचार, अपघातग्रस्त रुग्ण, गंभीर आजारांवरील शस्त्रक्रिया यामध्ये रक्तदानाचे असाधारण महत्त्व लक्षात घेता, पोलीस दलाच्या या पुढाकाराने समाजात सकारात्मक संदेश गेला. कायदा-सुव्यवस्था राखणाऱ्या पोलीस यंत्रणेने सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव कृतीतून दाखवून दिली.
या उपक्रमात गडचिरोली विशेष अभियान पथकाचे प्रभारी अधिकारी कल्पेश खारोडे यांनी आपल्या पत्नी श्रीमती पूजा कल्पेश खारोडे यांच्यासह संयुक्तपणे रक्तदान करून उपस्थितांसमोर आदर्श ठेवला. “आज समाजाचा जबाबदार घटक म्हणून रक्तदान करणे ही काळाची गरज आहे,” हा संदेश त्यांनी कृतीतून अधोरेखित केला. त्यांच्या या पुढाकाराचे पोलीस दलासह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
विशेष म्हणजे, नक्षलग्रस्त व दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात अशा मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन होणे ही बाब सामाजिक एकजुटीचे आणि पोलीस–नागरिक समन्वयाचे द्योतक ठरली आहे. प्रोजेक्ट उडानसारख्या उपक्रमांमुळे पोलीस दलाची प्रतिमा केवळ कडक अंमलबजावणी करणारी यंत्रणा न राहता, समाजाच्या दुःखात सहभागी होणारी संवेदनशील शक्ती म्हणून अधिक ठळक होत आहे.
गडचिरोली पोलीस दलाने घेतलेला हा पुढाकार भविष्यातील सामाजिक उपक्रमांसाठी प्रेरणादायी ठरणारा असून, “रक्तदान हे श्रेष्ठदान” ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून साकार करणारा हा उपक्रम म्हणून नोंद घेण्यासारखा आहे.