गडचिरोली जिल्ह्यात पोषण, आरोग्य व बालविकाससाठी टाटा ट्रस्टसोबत सामंजस्य करार

स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे होणार वेगाने परिवर्तन- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली/मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे आज टाटा ट्रस्ट व नाम फाउंडेशन यांच्यासोबत विविध क्षेत्रांतील विकासासाठी सामंजस्य करार करण्यात आले. विविध स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून महाराष्ट्राचे वेगाने परिवर्तन होईल,असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला. या करारांपैकी गडचिरोली जिल्ह्यासाठी आरोग्य, पोषण, बालविकास, जलसंधारण आणि ग्रामीण उपजीविका बळकट करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा तसेच टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा आणि नाम फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्यातील प्रत्येक कुटुंबाला आरोग्य, पोषण, पाणी सुरक्षा आणि शाश्वत उपजीविका उपलब्ध करून देणे हे शासनाचे प्राधान्य असून स्वयंसेवी संस्थांच्या भागीदारीतून योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होणार आहे.

गडचिरोलीसाठी पोषण व बालविकासावर विशेष लक्ष

  • सदर सामंजस्य कराराअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात खालील उपक्रम राबविण्यात येणार आहेत:
  • ० ते ६ वर्षे वयोगटासाठी बालसंगोपन सुविधा उभारणे, ज्यामुळे लहान बालकांना सुरक्षित वातावरणात पोषण व प्राथमिक आरोग्यसेवा मिळेल.
  • ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांसाठी फळांचे वितरण व जीवनसत्व ‘सी’ गोळ्यांचे वाटप, ज्यामुळे कुपोषण व रक्तक्षय रोखण्यास मदत होईल.
  • जिल्ह्यातील पोषण व आरोग्य सेवांमधील तफावत ओळखण्यासाठी तीन महिन्यांत सर्वेक्षण मोहीम तात्काळ सुरू करण्यात येणार आहे.

दोन वर्षांखालील बालकांमधील खुंटलेली वाढ, कमी वजन आणि कुपोषण रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार असून किशोरवयीन मुलामुलींमध्ये पोषणाविषयी जागरूकता वाढवून रक्तक्षय निर्मूलनावरही भर दिला जाणार आहे. ‘टेक-होम रेशन’ योजनेचे वितरण अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाशी समन्वय साधला जाणार आहे.

आरोग्यसेवा बळकटीकरण व गंभीर आजारांवरील उपचार

कराराच्या माध्यमातून टेलिमेडिसिनसह प्राथमिक आरोग्य सेवा ग्रामीण व दुर्गम भागात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत दुर्धर आजारांवरील उपचार अधिक सुलभ व परवडणारे करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. नागपूर येथील मान्यताप्राप्त रुग्णालयांशी करार करून गरजू रुग्णांना आर्थिक सहाय्य देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

जलसंधारण व शाश्वत उपजीविकेला चालना

नाम फाउंडेशनच्या सहभागातून तलाव पुनरुज्जीवन, गाळ काढणे, नाले व नद्यांचे खोलीकरण आणि भूजल पुनर्भरण यांसारख्या कामांना गती दिली जाणार आहे. कमी पर्जन्यमान व पाणीटंचाईग्रस्त भागांमध्ये मृद व जलसंधारण उपाययोजना राबवून शेती व पशुधन विकासास चालना देण्यात येणार आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान आधारित शेती पद्धतींचा प्रसारही केला जाणार आहे.

असे आहेत करार

टाटा ट्रस्टच्या सोबत राज्य शासनाने एकूण १२ करार केलेले आहेत. यामध्ये ग्रामविकास, जलसंधारण, सार्वजनिक आरोग्य, महिला व बालविकास, गडचिरोली जिल्हा प्रशासन, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, नागपूर येथील राष्ट्रीय कर्करोग संस्था, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, मध्य भारत आयुर्विज्ञान संस्था, केअर हॉस्पिटल, स्वामी विवेकानंद मेडिकल मिशन, मिदास मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सोबत सामंजस्य करारांचा समावेश आहे. तसेच नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स यांचा जलसंधारण विभागासोबत करार करण्यात आला आहे.

gadchiroli colectorMou with TATA groupTata group work at gadchiroli