लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओम चुनारकर,
आलापल्ली (गडचिरोली): जिल्ह्यातील दुर्गम, नक्षलग्रस्त आणि मागास मानल्या जाणाऱ्या भागातूनही जिद्दीच्या बळावर स्वप्न पूर्ण करता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे आलापल्लीच्या मृणाल लक्ष्मण रत्नम यांनी. जिल्हा परिषदेच्या साध्या शाळेत शिक्षण घेतलेल्या या तरुणाने अखेर दंतवैद्यकशास्त्राच्या क्षेत्रात चमकदार यश मिळवून केवळ आपल्या कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
अमरावती येथील विदर्भ यूथ वेल्फेअर सोसायटी संचालित डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये ३१ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित ‘CELESTIA 2025’ या भव्य समारंभात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात आलापल्ली येथील मृणाल रत्नम यांना Oral Medicine & Radiology या विषयात २०२३–२४ या शैक्षणिक सत्रात विशेष प्रावीण्य मिळविल्याबद्दल Certificate for Distinction देऊन गौरविण्यात आले. एवढ्यावरच न थांबता अंतिम बी.डी.एस. परीक्षेत २ रे स्थान पटकावण्याचा मानही मृणाल यांनी मिळवला. त्याबद्दल त्यांना Certificate of Merit व विशेष स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. व्ही. गोंधळेकर, कार्यक्रम प्रभारी डॉ. श्रुती वानखेडे आणि सोसायटीचे सरचिटणीस अनिकेत इंगळे यांनी मृणालचे कौतुक करताना त्याच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या. गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यातून आलेला विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत आपली छाप सोडतो, ही बाब प्रत्येकासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यावेळी मान्यवरांनी नमूद केले.
मृणालचे वडील लक्ष्मण रत्नम हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असून आई वंदना गृहिणी आहेत. पालकांनी मुलाच्या शिक्षणासाठी अपार परिश्रम घेतले. त्यांच्या त्या कष्टाचे फळ आज जिल्हाभर कौतुकास्पद ठरत आहे. साध्या जिल्हा परिषदेच्या शाळेतून सुरू झालेला शैक्षणिक प्रवास अमरावतीसारख्या मोठ्या शहरातील दंतवैद्यकीय महाविद्यालयापर्यंत पोहोचला आणि तिथेही गुणवंत ठरत मृणालने आपली वेगळी ओळख निर्माण केली.
मृणाल या यशाचे श्रेय आपल्या आईवडिलांना, गुरुजनांना आणि मित्रमंडळींना देतो. “सतत प्रोत्साहन, आधार आणि योग्य मार्गदर्शन नसते तर इतक्या मोठ्या व्यासपीठावर पोहोचणे कठीण झाले असते,” असे मृणाल सांगतो. आलापल्लीसारख्या लहानशा शहरातून बाहेर पडून स्पर्धेच्या प्रखर वातावरणात टिकून राहणे आणि चमक दाखवणे ही बाब पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे.
नक्षलग्रस्त आणि सामाजिक – दृष्ट्या मागासलेल्या भागात राहणाऱ्या तरुणांनी योग्य नियोजन, सातत्य आणि आत्मविश्वासाच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते, हे मृणाल रत्नमच्या यशाने स्पष्ट केले आहे. त्याच्या या कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ग्रामीण विद्यार्थी आणि पालकांना नव्या दिशा व आशेचा किरण दिसला आहे.
हे यश केवळ मृणालपुरते मर्यादित नसून संपूर्ण गडचिरोलीच्या सामाजिक उन्नतीचे प्रतीक ठरते. कारण, दुर्गम भागातील साध्या मराठी जिल्हा परिषद शाळांमधून शिकूनही जागतिक दर्जाची कामगिरी करता येते, हे त्याने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जिल्हा या तरुणाची पाठ थोपटत आहे….