लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली : मुक्तिपथ तर्फे नियोजित दिवशी तालुका मुख्यालयी आयोजित व्यसन उपचार क्लिनिकच्या माध्यमातून अनेक रुग्ण दारूच्या व्यसनापासून दूर झाले आहेत. नुकतेच एटापल्ली, गडचिरोली, मुलचेरा, सिरोंचा व चामोर्शी तालुका क्लिनिकच्या माध्यमातून एकूण ५९ रुग्णांनी उपचार घेतला आहे.
गडचिरोली सारख्या दुर्गम जिल्ह्यात मुक्तिपथच्या पुढाकारातून तालुका मुख्यालयी व्यसन उपचाराची सोय उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत ग्रामीण, शहरी, दुर्गम व अतिदुर्गम भागातील रुग्णांनी सुद्धा या सेवेचा लाभ घेऊन आपल्या जीवनात आनंद भरला आहे. हे क्लिनिक अनेक रुग्णांसाठी वरदान ठरले आहे. जिल्ह्यातील बाराही तालुकास्थळी नियोजित दिवशी क्लिनिक घेतले जाते. यातुन दारूचे दुष्परिणाम, दारूचे शरीरावर होणारे परिणाम, धोक्याचे घटक, सामाजिक नुकसान, योग्य उपाययोजना, औषधोपचार व समुपदेशन देखील तज्ञांच्या माध्यमातून दिला जातो. यामुळे दारूचे व्यसन सोडण्यासाठी रुग्णांना प्रवृत्त करणे शक्य होत आहे. एटापल्लीमध्ये १४, गडचिरोली १७, मुलचेरा ७, सिरोंचा १२ तसेच चामोर्शी ९ अशा एकूण ५९ रुग्णांनी उपचार घेत दारूमुक्तीचा ध्यास घेतला आहे.