मुंबईत पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता, महिनाभरात तब्बल ४५ हजार सक्रीय रुग्ण

  • मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठे विधान केले आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. २ एप्रिल: मुंबईत कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईत पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये मुंबईत ज्या पद्धतीने निर्बंध लावण्यात आले होते, तसेच निर्बंध आताही लागण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठे विधान केले आहे. मुंबईत कोरोनाचा कहर वाढला आहे. त्यामुळे मुंबईत मॉल, मंदिर आणि गर्दीच्या ठिकाणी निर्बंध लावले जाऊ शकतात. तसेच दुकाने आणि बाजरपेठा एक दिवस आड सुरू करण्यात येईल, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्याशिवाय मुंबईतील लोकलमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश दिला जाण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे मुंबईत गेल्यावर्षीच्या मार्चसारखीच परिस्थिती निर्माण होणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे.

आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान

मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये गेल्या महिन्याभरात ४५ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येसह सक्रीय रुग्ण संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या एका महिन्यात मुंबईतील एकूण अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या ही ५५ हजार ००५ वर पोहोचली आहे. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

गेल्यावर्षी मार्च महिन्यात मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाविरोधातील लढा आतापर्यंत सुरु आहे. मुंबई महापालिका आणि राज्य सरकारने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे डिसेंबर २०२० अखेरीस कोरोना आटोक्यात येत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत होते. त्यानंतर मात्र नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे फेब्रुवारी २०२१ मध्ये कोरोना रुग्ण पुन्हा झपाट्याने वाढू लागले आहे.

मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ

राज्यात कोरोना रुग्णांचा कहर पाहायला मिळत आहे. काल तब्बल ४३ हजार १८३ हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दररोज ७ ते ८ हजार कोरोनाबाधित आढळत आहे. तसेच मुंबईतील सक्रीय रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

गेल्या १ मार्च २०२१ मध्ये ९ हजार ६९० कोरोनाचे सक्रीय रुग्ण होते. तर काल १ एप्रिलला महिनाभरात ही संख्या तब्बल ५५ हजार ००५ वर पोहोचली आहे.  त्यामुळे वाढणारी रुग्णसंख्या ही मुंबईकरांच्या चिंता वाढवणारी ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने पुन्हा एकदा कंबर कसली आहे. तसेच मुंबईत ठिकठिकाणी आवश्यक आरोग्य सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील सक्रीय रुग्णांची सद्यस्थिती

  • १ मार्च –  ९६९०
  • १५ मार्च – १४५८२
  • २५ मार्च – ३३९६१
  • १ एप्रिल – ५५००५

मुंबईतील कोरोना स्थिती

मुंबईत आज कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. गेल्या २४ तासांत मुंबईत तब्बल ८ हजार ६४६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ५ हजार ३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात मुंबईत १८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी १४ रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये १२ पुरुष तर ६ महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या ५५ हजार ५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ८४ टक्क्यांवर पोहोचलाय. तर चिंताजनक बाब म्हणजे रुग्ण दुपटीचा कालावधी ४९ दिवसांवर आला आहे. २५ मार्च ते ३१ मार्च दरम्यानचा कोरोना वाढीचा दर पाहिला तर तो १.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

mumbailockdownagain