घरातच 20 तासांमध्ये चालला ६८ किलोमीटर आणि बनवला वर्ल्ड रेकॉर्ड.

सांगवीच्या भुमिपुञाचा जागतिक विक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई ३ नोव्हेंबर :- बालाजी सूर्यवंशी या  तरुणाने आपल्या राहत्या घरातच जवळपास वीस तास चालून जागतिक विक्रम केला आहे. त्याच्या या अतुलनीय कामगीरीमुळे नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालूक्याच्या सांगवीचे नाव सातासमुद्रापार गेले आणि या अविश्वसनीय कामगिरीमुळे बालाजी सुर्यवंशी या तरुणावर जगभरातून कौतुकीचा वर्षाव होत आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यासाठी ही खुपच अभिमानास्पद बाब ठरली आहे.
देगलूर तालुक्यातील सांगवी (क) येथे शेतकरी कुटूंबात जन्म झालेले बालाजी सुर्यवंशी यांनी आपल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, आपले उच्च शिक्षण पुर्ण करुन सध्या मुंबई येथील एका जगविख्यात कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत असून त्यांनी यापुर्वीही आपल्या अभ्यासु वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि अविरत परीश्रमाने तीन काव्यसंग्रह आणि एक लघु कादंबरीचे प्रकाशन झाले आहे. त्याचे देखील जगातील अनेक मान्यवरांनी कौतुक केले आहे.

२८ वर्षीय बालाजी सुर्यवंशी हे आपल्या मुंबई येथील राहत्या घरात सतत १९ तास ५५ मिनिटे चालत जवळपास ६८ किलोमीटराचा प्रवास घरातल्या घरातच केला आहे आणि त्यामध्ये त्यांनी एक लाख एकशे अठ्ठावीस (१,००,१२८) पावले चालले आहे. त्यांनी सप्टेंबर २०, २०२० रोजी रात्री बारा वाजता चालण्यास सुरुवात केली आणि त्याच रोजी संध्याकाळी ठीक सात वाजून पंचावन्न मिनिटांनंतर आपले चालणे थांबवले. देशातील अश्या प्रकारच्या आगळ्या वेगळ्या सर्वोच्च कामगिरी करणार्‍या असामान्य व्यक्तींचे नोंद ठेवणारी सरकारमान्य ”इंडीया बुक ऑफ रेकाॅर्ड” या प्रतिष्ठीत संस्थेने या विक्रमाची दखल घेतली आणि त्याचे मूल्यमापन करून विक्रमाची पुष्टी झाल्यानंतर बालाजी सुर्यवंशी यांना रेकॉर्ड धारक प्रमाणपञ आणि मेडल देवून सन्मान केला आहे.

माझी पूर्वीपासूनच अशी इच्छा होती की मी काहीतरी असे करावे की त्यामुळे एक सामाजिक संदेश गेला पाहिजे. सध्या या कोरोनामूळे लोक बरीच महिने झाले घरात आहेत, त्यामुळे आरोग्याविषयी निष्काळजी वाढत चालली आहे. मी हा रेकॉर्ड बनवण्याचं ठरवल कारण मला लोकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करायची होती. मला फक्त एवढाच संदेश द्यायचा आहे की जर आपल्याला खरोखर तंदुरुस्त आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर आपल्याला ना जीमची, ना खुल्या जागेची किंवा ना विशेष प्रशिक्षणाची आवश्यकता आहे. आपण फक्त उपलब्ध किंवा मर्यादित स्रोतांचा वापर करून आपलं आरोग्य तंदुरुस्त ठेवून, निरोगी जीवन जगू शकतो.