नगरपरिषद निवडणूक : मतमोजणीची प्रशासनाची जय्यत तयारी

उद्या २३ नगराध्यक्ष व ३३९ नगरसेवक उमेदवारांचे राजकीय भवितव्य होणार स्पष्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली , दि. २० : गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, देसाईगंज आणि आरमोरी या तीन नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी २ व २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून, रविवार दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी तांत्रिक, प्रशासकीय तसेच सुरक्षा यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीची मतमोजणी कृषी महाविद्यालय, सोनापूर येथे होणार असून, येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ७ टेबल्स तर पोस्टल बॅलेटसाठी १ टेबल, अशी एकूण ८ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे. देसाईगंज नगरपरिषदेची मतमोजणी नगरपरिषद सांस्कृतिक सभागृहात पार पडणार असून, येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी १० टेबल्स आणि पोस्टल बॅलेटसाठी १ टेबल, अशी एकूण ११ टेबल्स निश्चित करण्यात आली आहेत. आरमोरी नगरपरिषदेची मतमोजणी तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालय येथे होणार असून, येथे प्रत्यक्ष मतमोजणीसाठी ३ टेबल्स व पोस्टल बॅलेटसाठी १ टेबल, अशी एकूण ४ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे.

या तीनही नगरपरिषदांमधून नगराध्यक्ष पदासाठी एकूण २३ उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी ३३९ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. गडचिरोली नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी ७ आणि नगरसेवक पदासाठी १३१ उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे. देसाईगंज नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी ६ तर नगरसेवक पदासाठी १०० उमेदवार रिंगणात होते. आरमोरी नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदासाठी १० आणि नगरसेवक पदासाठी १०८ उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे.

मतमोजणीच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही निरीक्षण, मतमोजणी कर्मचाऱ्यांचे नियोजन, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींसाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पार पडणार असून, निकालाकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळासह नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Result day
Comments (0)
Add Comment