लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील आलापल्ली–सिरोंचा महामार्गावरील जंगल परिसरात झालेल्या निर्घृण खून प्रकरणाचा छडा लावत अहेरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत आरोपीला अटक केली आहे. मौजा नागेपल्ली येथील रविंद्र तंगडपल्लीवार (वय ५०) यांची धारदार शस्त्राने हत्या केल्याप्रकरणी समय्या मलय्या सुंकरी (वय ३५, रा. मद्दीगुडम, ता. अहेरी) याला अटक करण्यात आली आहे.
१८ जानेवारी रोजी आरडीचे पैसे भरण्यासाठी आलापल्लीला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेले रविंद्र तंगडपल्लीवार संध्याकाळपर्यंत परत न आल्याने अहेरी पोलीस ठाण्यात बेपत्ता तक्रार दाखल करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी नागामाता मंदिराजवळील जंगलात त्यांचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. डोके, मान व चेहऱ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे तपासात स्पष्ट झाले.
पोलीस अधीक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक कार्तिक मदीरा व उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेतला. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर २० जानेवारी रोजी त्याला अटक करण्यात आली.
२१ जानेवारी रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, माननीय न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी (PCR) मंजूर केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हर्षल ओकरे करीत आहेत.