लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा | प्रतिनिधी: सिरोंचा तालुक्यातील कोत्तापल्ली गावात एका ३० वर्षीय विवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर येऊन गावात एकच खळबळ उडाली. मात्र अवघ्या १२ तासांच्या आत पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत दोघा संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांच्या या जलद व तडाखेबंद कारवाईचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, रजिता सडवली मोर्ला (वय ३०, रा. कोत्तापल्ली) हिचा मृतदेह १४ मे २०२५ रोजी सकाळी गावातील सांबय्या दुर्गम यांच्या कापसाच्या शेतालगतच्या कंपाउंडजवळ आढळून आला. या घटनेमुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून, महिला मृत्यू प्रकरणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली.
या घटनेनंतर मृत महिलेच्या आईने स्थानिक पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करत तपासाला वेग दिला. तपासादरम्यान पोलिसांनी समय्या बालय्या दुर्गम (वय ३०, रा. कोत्तापल्ली) आणि प्रमोद मलय्या जाडी (वय २०, रा. नडीकुडा) या दोघांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात महिलेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या शंकेनुसार अनैतिक संबंधातून खून झाल्याची शक्यता पोलिसांनी गांभीर्याने घेतली.
अतिशय कुशलतेने पोलिसांचा तपास..
या गुन्ह्याचा तपास असरअल्ली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि समाधान दौड यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाला. पोलीस यंत्रणांनी गोपनीय माहिती, तांत्रिक पुरावे व बिनचूक विश्लेषणाच्या आधारे अवघ्या १२ तासांत या गुन्ह्यातील आरोपींना गजाआड केले.
दोघांनाही न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि दौड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलीस अधिकाऱ्यांचे समन्वयात काम..
या कारवाईत पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक (अहेरी) साई कार्तिक, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (सिरोंचा) संदेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. तपासकार्यात पो.उपनि. निखील मेश्राम, पो.उपनि. प्रसाद पवार, पो.ह.वा. महेश धाईत, संटीमल्लु लेंडगुरी, राजू कळंबे, संजय चाबकस्वार, प्रविण तोरैम, नेताजी राठोड यांनी मोलाचे योगदान दिले.
संभाव्य तणावाला वेळीच आळा..
या घटनेमुळे गावात काहीसा तणाव निर्माण होण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी वेळेवर योग्य पावले उचलून आरोपींना अटक केल्यामुळे संभाव्य सामाजिक तणाव टळला. स्थानिक ग्रामस्थांनी पोलिसांच्या दक्षतेचे व तत्परतेचे भरभरून कौतुक केले आहे.
गुन्ह्याच्या मुळाशी पोहोचण्याची गरज…
दरम्यान, या प्रकरणामागे असलेली पार्श्वभूमी आणि खऱ्या कारणांची चौकशी आवश्यक आहे. महिला अत्याचार व खूनाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना, पोलिसांची तत्काळ आणि परिणामकारक कारवाई ही समाजातील भयावहतेला आळा घालणारी ठरते. यापुढे अशा घटना टाळण्यासाठी ग्रामस्तरावर जागृती व सुरक्षेच्या उपाययोजना आवश्यक असल्याचे निरीक्षकांनी स्पष्ट केले आहे.