लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चामोर्शी: तालुक्यातील छोट्याशा मुरखळा चक्क (बल्लू) गावात जन्मलेली कु. रजनी किशोर चलाख ही कन्या आज संपूर्ण जिल्ह्याच्या अभिमानाचे प्रतीक ठरली आहे. गडचिरोलीसारख्या अतीदुर्गम आणि आदिवासी बहुल जिल्ह्यातील अत्यंत साध्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रजनीने आपल्या अफाट बुध्दी, शिस्तबद्ध अभ्यासवृत्ती आणि अथक परिश्रमाच्या जोरावर चार्टर्ड अकाऊंटंट होण्याच्या वाटेवरील पहिलं शिखर गाठलं आहे.
रजनीने नुकत्याच झालेल्या १२ वी (CBSE) परीक्षेत तब्बल ९४.२० टक्के गुण मिळवत ‘पी.एल. श्री. जवाहर नवोदय विद्यालया’त प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यानंतर सीए फाउंडेशन परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण होऊन आपल्या स्वप्नांच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. तिचं हे यश केवळ एका विद्यार्थिनीचं नाही, तर दुर्गम भागातील मुलींनी शिक्षणाच्या माध्यमातून गाठलेल्या सामाजिक उंचीचं प्रतीक आहे.
रजनीचं प्री-प्रायमरी शिक्षण ‘न्यू माऊंट कॉन्व्हेंट’, चामोर्शी येथे झाले. लहानपणापासून शिक्षणात तल्लख बुद्धिमत्ता असल्याने नक्कीच नक्कीच नाव लौकिक करणार हे शिक्षकांना भाकीतच केलं होतं .“ही मुलगी एक दिवस आई-वडिलांचं आणि जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करेल.” आज ती भविष्यवाणी अचूक ठरली आहे.
रजनीचं प्राथमिक शिक्षण ‘निशिगंधा कॉन्व्हेंट’ येथे झालं. त्यानंतर तिची निवड जवाहर नवोदय विद्यालय, घोट येथे झाली आणि इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत तिने तेथे शिक्षण घेतलं. पुढील शिक्षणासाठी जवाहर नवोदय विद्यालय, अकोला येथे दाखल होत तीने इयत्ता अकरावी-बारावीमध्येही प्रथम क्रमांक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली.
बालपणापासूनच चार्टर्ड अकाऊंटंट होण्याचं स्वप्न मनात बाळगलेल्या रजनीने अभ्यासात सातत्य, शिस्त आणि तर्कबुद्धी यांचा मिलाफ राखत आपलं उद्दिष्ट गाठलं. शिक्षणाच्या प्रवासात तिला सर्व गुरुजनांचे मार्गदर्शन आणि आई-वडिलांचे निःस्वार्थ पाठबळ लाभले.
रजनी बोलतांना म्हणाल्या “लहानपणापासूनच मला सीए बनायचं होतं. आज सीए फाउंडेशन परीक्षा उत्तीर्ण झाल्याने माझ्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकता आले. हे यश माझ्या आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे आहे.”
गावातील लहानशा शाळेतून सुरुवात करून राष्ट्रीय दर्जाच्या परीक्षांपर्यंत पोहोचलेली ही यशकथा आज प्रत्येक ग्रामीण विद्यार्थ्यासाठी प्रेरणास्थान ठरत आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात जेथे शिक्षणाची साधनं मर्यादित आहेत, तेथे रजनीने दाखवलेला मार्ग खऱ्या अर्थाने “शिक्षण हेच परिवर्तनाचं साधन” असल्याचं जिवंत उदाहरण आहे.
रजनीच्या या यशामुळे केवळ तिच्या कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण तालुक्याचं आणि जिल्ह्याचं मस्तक अभिमानाने उंचावलं आहे. तिच्या बुद्धिमत्तेचा हा प्रवास अजून अनेक मुलींना प्रेरणा देणारा ठरेल यात शंका नाही.