जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापौर आयोजित ‘माझी मुंबई’ बालचित्रकला स्पर्धा १० जानेवारी, २०२१ रोजी ऑनलाईन पद्धतीने

लाखो विद्यार्थ्यांना सहभागी करुन घ्यावे, महापौर श्रीम. किशोरी किशोर पेडणेकर यांचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, २२ डिसेंबर: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त ‘बालचित्रकला स्पर्धा २०२०-२१’ चे आयोजन दिनांक १० जानेवारी, २०२१ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० या वेळेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने तयार केलेल्या पोर्टलवरुन घेण्यात येणार आहे. या बालचित्रकला स्पर्धेत मुंबईतील सर्व शाळांतील लाखो विद्यार्थ्यांनी सहभागी करुन घ्यावे, असे आवाहन मुंबईच्‍या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांनी केले आहे.

याकरिता बालचित्रकला स्पर्धेत १ ते १० जानेवारी २०२१ रोजी स्पर्धा सुरु होईपर्यंत विद्यार्थ्यांना सहभाग घेता येईल. याकरिता विद्यार्थ्यांना सहभाग घेतल्याचे महापौरांच्या स्वाक्षरीचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी १२.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांनी आपले चित्र शिक्षण विभागाच्या पोर्टलवर अपलोड करावे.

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दरवर्षी बालचित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात येते. या स्पर्धेत गतवर्षी ७८ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. मुंबईच्‍या महापौर श्रीम. किशोरी किशोर पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज (दिनांक २२ डिसेंबर, २०२०) महापालिका मुख्यालयातील समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती, त्‍यावेळी अधिकाऱयांना मार्गदर्शन करताना त्‍या बोलत होत्‍या.

या बैठकीस उप महापौर श्री. सुहास वाडकर, आमदार श्री. मंगेश कुडाळकर, शिक्षण समितीच्‍या अध्यक्षा श्रीमती संध्या दोशी (सक्रे), सुधार समितीचे अध्यक्ष श्री. सदानंद (सदा) परब, शिक्षणाधिकारी श्री. महेश पालकर तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
महापौर श्रीम. किशोरी किशोर पेडणेकर मार्गदर्शन करताना म्‍हणाल्‍या की, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बालचित्रकला स्पर्धा कोविड – १९ च्या संसर्गजन्य साथरोगामुळे रद्द न करता ऑनलाईन पद्धतीने २०२०-२१ चे नियोजन करण्यात यावे.

त्‍याचप्रमाणे वर्तमानपत्रात देण्‍यात येणाऱया जाहिरातीत स्‍पर्धा मुंबई हद्दीतील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा आहे असा स्‍पष्‍ट उल्लेख करुन स्पर्धा सुरु होण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्‍पर्धकांना सहभागी करुन घेण्‍याची सुचनाही महापौरांनी केली. त्‍याचप्रमाणे स्‍पर्धेच्‍या आयोजनाबाबत बेस्ट बसेस, बस स्टॉप व सर्व विभाग कार्यालयाच्या सीएफसी येथे जाहिराती होर्डिंग्ज लावण्यात यावे. तसेच महापालिकेच्या सर्व समाजमाध्यमात यावर पुरेशा प्रमाणात या स्पर्धेविषयी जनजागृती आणि माहिती सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.