नागपूरकराची दिवाळी जोरात; कोरोनाची पर्वा न करता बर्डीवर तुफान गर्दी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर डेस्क :- नागपूरमध्ये दिवाळीच्या खरेदीकरिता तुफान गर्दी उसळली आहे. सीताबर्डी मेनरोडवर या गर्दीने उच्चांक गाठला आहे. कोरोनाची पर्वा न करता महिला, तरुणी मोठ्या प्रमाणात खरेदीकरिता घराबाहेर पडल्या आहेत. दिवाळीच्या झगमगाटासाठी बर्डी मेनरोड वरील बाजारात गर्दीमुळे बाजारावर पसरलेले मंदीचे सावट दूर झाले आहे. काही जण तोंडाला मास्क लावून तर काही कोरोनाची पर्वा न करता रविवारी दिवसभर खरेदीचा आनंद लुटला. बर्डी मेन रोडपासून सुरू झालेला बाजार आज सीताबर्डी मेट्रो स्टेशनपर्यंत पसरला होता.

सीताबर्डीच्या मेन रोडवरील बाजारावरून शहरवासीयांच्या खिशाचा अंदाज बांधला जातो. यावर्षी १४ नोव्हेंबरला दिवाळी आहे. त्यामुळे रविवारच्या खेरदीकरिता आज शेवटचा बाजार होता. आतापर्यंत रविवारी टाळली जाणारी गर्दी बाजारात फुल्ल होती. या गर्दीमध्ये महिलांचा विशेष भरणा होता. तरुण-तरुणींकरिता तयार कपडे, चपला-जोडे, सौंदर्य प्रसाधने आदी विविध प्रकारच्या साहित्यांची विक्री सुरू होती. याशिवाय परंपरागत दिवाळीचे दिवे, विद्युत रोषणाईचे दिवे, आकाश कंदील, विविध रंगी रांगोळ्या आदींची दुकाने सजली होती. फुटपाथ दुकानदारांवर तोबा गर्दी होती.

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दसरा आला होता. आता कोरोनाचे रूग्ण दररोज कमी होत आहेत. त्यामुळे लोकांनी दिवाळीच्या खेरदीकरिता घराबाहेर पडल्याचे चित्र आहे. राज्य शासनाने बहुतांश सेवा व क्षेत्र अनलॉक केले आहे. शहरातील सर्वच बाजारपेठांमध्ये आज रविवारी गर्दी होती. मॉल्स, इतर व्यवसाय सुरू झाले आहेत. फुटपाथ दुकानदारांप्रमाणेच मोठ्या दुकानांवरही लोकांची गर्दी वाढलेली होती. दिवाळीचे खाद्य पदार्थ, विद्युत दिव्यांची खरेदी आदी दुकानांमध्ये सोशल डिस्टन्सची पर्वा न करता ग्राहक जात होते.

nagpur covid