लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नागपूर, दि. १४ :
नागपूर येथे नुकतेच पार पडलेले सात दिवसांचे हिवाळी अधिवेशन हे पूर्णपणे वांझोट ठरले असून या अधिवेशनातून ना शेतकऱ्यांच्या हाती काही लागले, ना विदर्भातील जनतेला दिलासा मिळाला. जनतेच्या वाट्याला केवळ निराशेच्या अक्षताच आल्या, अशी तीव्र टीका विरोधी पक्षांनी केली. अधिवेशन संपल्यानंतर विरोधकांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.
या वेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते भास्कर जाधव म्हणाले की, “हे अधिवेशन विदर्भासाठी नव्हे, तर निवडणुकीच्या तोंडावर सरकारी तिजोरीतील पैसा खर्च करण्यासाठीच घेण्यात आले. सरकारने ज्या घोषणा केल्या त्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईपुरत्याच मर्यादित होत्या. विदर्भासाठी एकही ठोस घोषणा करण्यात आली नाही. हे अधिवेशन म्हणजे विदर्भाच्या जनतेची उघड फसवणूक आहे.”
महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हे अधिवेशन घेण्यात आले, असा आरोप करत सचिन अहिर यांनी सांगितले की, सरकारवर गंभीर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र त्यावर प्रश्न उपस्थित करूनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
विदर्भातील धान, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या अधिवेशनाकडे आशेने पाहत होता. “धान व सोयाबीनला बोनस द्यावा, अशी मागणी आम्ही सातत्याने केली; मात्र सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले,” अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. राज्यातील तरुण पिढी ड्रग्सच्या विळख्यात अडकत असताना सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका मांडण्यात आली नाही, असेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस विधानपरिषदेचे गटनेते सतेज पाटील म्हणाले, “या अधिवेशनात केवळ घोषणांचा पाऊस पडला. कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी करूनही कोणताही निर्णय झाला नाही. खिशात पैसे नाहीत, पण घोषणा मात्र अमर्याद — हीच महायुती सरकारची अवस्था आहे. इतक्या घोषणा करण्यात आल्या की त्यासाठीचा अर्थसंकल्पही अपुरा पडेल.”
मुख्यमंत्री राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येत असल्याचे आणि सामंजस्य करार (MoU) झाल्याचे सांगतात; मात्र प्रत्यक्षात त्या कंपन्या महाराष्ट्रात येत नाहीत आणि गुंतवणूक जमिनीवर उतरत नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली. त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले; मात्र सरकारकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. “सात दिवसांच्या अधिवेशनातून जनतेच्या पदरी केवळ निराशाच आली,” असे जयंत पाटील म्हणाले. विरोधकांनी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली; परंतु सत्ताधाऱ्यांनी मुद्देसूद उत्तर देणे टाळले, असा आरोप शशिकांत शिंदे यांनी केला.