नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय , पोलीस अधीक्षक कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी.

आरोपीला अर्धापूर येथून अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नांदेड डेस्क 24 मे:- दहा कोटी रुपये द्या ; नाहीतर नांदेडचे जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, जिल्हा परिषद, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय व अन्य शासकिय कार्यालय बॉम्बने उडवून टाकू, अशा धमकीचा मेल पाठवणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (ता.23) अटक केली. त्याच्या विरोधात वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील 125 जागी हॉटस्पॉट फुटायला तयार आहेत, अशी धमकी होती. सोबतच त्याने सर्व कार्यालयांची लिस्ट जोडली होती.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ई मेल आयडीवर 8 मे रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास एक मेल आला. यामध्ये 10 कोटी रुपये द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधिक्षक कार्यालय, इतर महत्वाची कार्यालये आणि संपुर्ण नांदेड शहर बॉम्बने उडवून टाकेन असा संदेश सदरील ई-मेलने लिहिलेला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मोठी खडबड उडाली. पोलिसांनी या प्रकरणी विविध आंतरराष्ट्रीय कंपनीसोबत संपर्क साधून या मेल पाठविणाऱ्याची माहिती मिळवली. आरोपी शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ (35, व्यवसाय व्यापारी, रा.आगापुरा अर्धापूर, जि.नांदेड यास रविवारी अटक केली. पोलीस उपनिरिक्षक आशिष बोराटे यांच्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात धमकीचा मेल पाठविणाऱ्या शेख अब्दुल रफिक अब्दुल रऊफ याच्याविरूद्ध सायंकाळी गुन्हा दाखल करण्या आला.