लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नाशिक,दि.१४ जुलै:- केंद्र शासनाप्रमाणे राज्य शासनाने देखील पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी अशी मागणी वारंवार नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून करण्यात येत होती. या मागणीला अखेर यश मिळाले असून राज्य शासनाने पेट्रोलदरात ५ तर डिझेलच्या दरात ३ रुपये कपात केली आहे. या दरकपातीच्या निर्णयाचे नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनकडून स्वागत करण्यात येत असून या निर्णयामुळे राज्यातील वाहतुकदारांना इतर राज्याच्या वाहतुकदारांसोबत काम करण्यात उपयुक्त ठरणार असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र फड यांनी केली आहे.
अध्यक्ष राजेंद्र फड यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, डिझेल आणि पेट्रोलच्या सातत्याने होत असलेल्या दरवाढीमुळे वाहतुकदार अडचणीत आलेले होते. केंद्र सरकारने काही अंशी दरकपात केल्याने दिलासा मिळाला होता. मात्र राज्य शासनाकडून दरकपात करण्यात आलेली नव्हती तसेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेलचे दर अधिक होते. त्यामुळे इतर राज्यांच्या वाहतुकदारांना अधिक फायदा मिळत होता. महाराष्ट्रातील वाहतुकदारांपेक्षा कमी भाड्यात त्यांच्याकडून वाहतूक केली जात होती. त्यामुळे राज्यातील वाहतूकदार अडचणीत आले होते. याबाबत नाशिक डिस्ट्रिक्ट ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने शासनाकडे वारंवार पाठपुरावा सुरू होता. अखेर आज शासनाने दरकपतीचा निर्णय घेतल्याने राज्यातील वाहतुकदारांना मोठा दिलासा मिळेल असे राजेंद्र फड यांनी म्हटले आहे.