शासनाच्या बेजबाबदारपणामुळे नाशिक दुर्घटना – ॲड. प्रकाश आंबेडकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अकोला, दि. २१ एप्रिल: नाशिक मधील दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून शासनाच्या चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या डॉक्टर झाकीर हुसेन रूग्णालयात ऑक्सिजन पुरवठा बंद केल्यामुळे २२ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

ऑक्सिजन पुरवठा करण्यापासून ते टँकर भरेपर्यंत सर्व कामे खासगी ठेकेदारांना देण्यात आली असल्याची माहिती ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते पुढे म्हणाले की टँकरमधील ऑक्सिजन टाकीत भरत असताना वॉल बंद करण्यात आला होता तो बंदच राहिला. त्यामुळे व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा न झाल्याने त्यांना आपले प्राण गमवावे लागले. हा मनुष्यवध असल्याचा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. शासनाचा हा दुर्लक्षपणा असून या दुर्घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आदरांजली वाहिली तसेच या घटनेला जबाबदार असलेल्या ठेकेदारावर शासन कारवाई करेल अशी अपेक्षा ही त्यांनी या वेळी व्यक्त केली.

Adv. Prakash Ambedkar