लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक, 22 मे:- सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. आता शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. असं असलं तरी ग्रामीण भागात कोरोना विषाणूशी लढण्यासाठी पुरेशी व्यवस्था तयार झाली नाही. त्यामुळे गावातील नागरिकांना कोरोनाची बाधा झाली, तर त्यांना शहराच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी उपचारासाठी घेऊन जावं लागत आहेत. परिणामी वेळेवर उचपार न मिळाल्यानं अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. हीच गरज लक्षात घेऊन काही तरुणांनी आपल्या गावासाठी भरीव मदत केली आहे. जेणेकरून गावातील लोकांचे उपचार गावातच होतील.
नांदगाव तालुक्यातील पिंपरखेड या गावातील काही तरुण नोकरी निमित्त शहरात गेले होते. पण गावावर कोरोनारुपी आलेलं संकट पाहून ते गावाच्या मदतीसाठी सरसावले आहेत. संबंधित तरुणांनी आरोग्य केंद्राला लाखो रुपयांचे औषधे, ऑक्सिजन कॉन्स्टट्रेटरसह अन्य वैद्यकीय साहित्य दिलं आहे. असं म्हणतात ना, माणूस कुठंही गेला आणि कितीही मोठा झाला तरी जन्मगावासोबत त्याची नाळ कायमची जोडली जाते. याचा प्रत्यय नांदगाव तालुक्यातील पिंपरखेडच्या ग्रामस्थांना आला आहे.
सध्या गावावर कोरोनाचं संकट आलं असून गावाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले किंवा स्थायिक झालेले काही तरुण गावकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. त्यांनी सुमारे तीन लाख रुपये गोळा करून गावासाठी औषधं आणि इतर महत्त्वाची उपकरणं देऊन भूमीपुत्रांची जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला आहे.