लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंदिय दि,२९ : बस्तर ते महात्मा गांधीच्या वर्धा सीमापर्यंत पसरलेल्या महाराष्ट्र–मध्यप्रदेश–छत्तीसगड (एमएमसी) पट्ट्यातील नक्षल चळवळीला आज एक निर्णायक धक्का बसला. विशेष झोनल कमिटीचा प्रवक्ता आणि भीषण रणनीतीकार म्हणून ओळखला जाणारा अनंत उर्फ विकास नागपुरे तसेच दरेकसा दलमचे ११ जहाल नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर शस्त्रास्त्रांसह शरणागती पत्करली. या सर्वांवर मिळून ८९ लाखांचे बक्षीस घोषित होते, तर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा, स्फोटके आणि दस्तऐवज जप्त केले आहेत. हिडमाच्या मृत्यूनंतर हादरलेल्या नक्षल संघटनेच्या कणावरील हा आणखी एक निर्णायक प्रहार मानला जात आहे.
एमएमसी क्षेत्रीय समितीने काही दिवसांपूर्वीच आत्मसमर्पणाची इच्छा व्यक्त केली होती. प्रवक्ता अनंतने २४ नोव्हेंबरला १५ फेब्रुवारीपर्यंत वेळ मागत पत्रक काढले होते. मात्र छत्तीसगडचे गृहमंत्री विजय शर्मा यांनी “सरकारकडे वेळ नाही — तात्काळ शस्त्रत्याग करा” असा कठोर इशारा दिल्यानंतर नक्षल नेतृत्व गडबडले. २७ नोव्हेंबरला त्यांनी १ जानेवारी २०२६ रोजी सामूहिक आत्मसमर्पण करू असे नव्या पत्रकात जाहीर केले होते. पण सुरक्षा दलांची वाढती घेराबंदी, जंगलातील कमी होत चालला पुरवठा, आणि अंतर्गत अविश्वासामुळे त्यांनी जाहीर तारखेच्या आधीच गुप्त संपर्क साधत आज शरणागती निवडली.
या निर्णयामुळे एमएमसी पट्ट्यातील नक्षलवाद्यांच्या संघटनात्मक कणात मोठी तडे गेलेली स्पष्ट दिसत आहे. प्रवक्ता अनंत हे धोरणात्मक नियोजन, भरती, लॉजिस्टिक नियंत्रण आणि छुप्या घातपाती कारवायांचे प्रभावी सूत्रधार मानले जात. त्यांच्या शरणागतीनंतर उर्वरित दलमांमध्ये तीव्र दहशत व अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्याचे सुरक्षा सूत्रांचे म्हणणे आहे.
शरणागती करणाऱ्यांची यादी:
अनंत उर्फ विकास नागपुरे (स्पेशल झोनल कमिटी मेंबर), नागसु गोलू वड्डे (डीव्हीसीएम कमांडर), रानो पोरेटी, संतु पोरेटी, संगीता पंधरे, प्रताप बंतूला, अनुजा कारा, पुजा मुडीयम, दिनेश सोट्टी, शीला मडावी, अर्जुन दोडी. ही सर्व मंडळी दरेकसा, कोंडासूर, पेरिमेली, कोहमेट्टा, कन्हारगाव या अतिसंवेदनशील पट्ट्यात सक्रिय होती. अनेक अंबुश, प्राणघातक स्फोट, जंगलातील लांब पल्ल्याचे मार्च आणि पोलिसांवरील प्रमुख घातपात यांचे नियोजन या गटाकडून केले जात असल्याची महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांनी दिली.
पोलीसांनी जप्त केलेल्या साहित्यात रायफल्स, कार्बाईन, देशी कट्टे, आयईडी बनविण्याचे साहित्य, डेटोनेटर, जिलेटिन स्टिक्स, वॉकी-टॉकी सेट, नकाशे, गुप्त दस्तऐवज आणि लॉजिस्टिक सामग्री यांचा समावेश आहे. जप्तीची आकारमान आणि स्वरूप पाहता हा एमएमसी पट्ट्यातील अलीकडील सर्वात मोठा धक्का नक्षल संघटनेला बसल्याचे मानले जात आहे.
गोंदिया–गडचिरोली–बस्तर या तिरंग्या पट्ट्यातील हे सामूहिक आत्मसमर्पण उग्रवादमुक्त प्रक्रियेतील एक निर्णायक टप्पा मानला जात आहे. सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाया, सातत्याने वाढणारी जंगलातील उपस्थिती, आणि संवाद व पुनर्वसनाच्या नव्या पायवाटा या सर्वांचा परिणाम म्हणून या शरणागतीकडे पाहिले जात आहे.
ही कारवाई पोलिसांसाठी केवळ यश नसून, दशकानुदशके उग्रवादाने जखमी झालेल्या भागांमध्ये शांततेची नवी दारे व विकासाची खऱ्या अर्थाने आशा निर्माण करणारी आहे. पुढील काही आठवड्यांत नक्षल नेतृत्वाच्या उरलेल्या संरचनेचा कोणत्या दिशेने प्रवास होतो, हे लक्षपूर्वक पाहण्यासारखे ठरणार आहे.