भामरागड-लाहेरी मार्गावर नक्षल्यांनी झाडे तोडून अडवली बस. बॅनर लावून बंद यशस्वी करण्याचे केले आवाहन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:  

गडचिरोली, दि. २६ नोव्हेंबर: गडचिरोली बस आगारातून सुटलेली बस नक्षल्यांनी काल २५ नोव्हेंबरच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास रस्त्यावर झाडे आडवी टाकून अडविली होती. रोडवर तोडलेल्या झाडावर बॅनर बांधण्यात आले होते. त्यामध्ये माओवाद्यांनी २६ नोव्हेंबर चा बंद यशस्वी करून ब्राह्मणीय, हिंदुत्व, फँटिस्ट ताकदीना हरवून मोदी सरकारच्या नीतीचा निषेध केला आहे. शाळा, कॉलेज बंद ठेवा, मोदी सरकारचा पुतळा जाळणार, कोरोना रोगापासून वाचण्यासाठी जनजागृती रॅली चे आयोजन करणार.असा मजकूर पश्चिम सबझोनल ब्युरो भाकप माओवादी भामरागड एरिया यांनी  बॅनर मधून जनतेला आवाहन करण्यात आले आहे.त्यामुळे दुर्गम भागात दहशत निर्माण झाली आहे.  

काल २५ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजता गडचिरोली येथील आगारातून एमएच ४०-एक्यू ६०३८ क्रमांकाची बस भामरागड तालुक्यातील लाहेरी गावाकडे जाण्यास निघाली. रात्री आठ वाजताच्या सुमारास भामरागड-लाहेरी मार्गावर नक्षल्यांनी झाडे तोडून आडवी टाकली होती. शिवाय बॅनरही बांधले होते. त्यामुळे बस पुढे नेता आली नाही. परिणामी बसच्या चालक व वाहकाने बसमध्येच रात्र जागून काढली. बसमध्ये तीन प्रवासी होते. ते लाहेरी परिसरातीलच असल्याने पायी निघून गेले. आज सकाळी पोलिसांनी रस्त्यावरील झाडे बाजूला केली असून, सकाळी बस धोडराज पोलिस ठाण्यात आणण्यात आली. बसचे चालक व वाहक सुरक्षित असल्याची माहिती गडचिरोलीचे आगारप्रमुख मंगेश पांडे यांनी दिली.

नक्षल्यांनी बांधलेल्या बॅनरवर २६ नोव्हेंबरचा देशव्यापी संप यशस्वी करण्याविषयीचा मजकूर लिहिला आहे. येत्या २ डिसेंबरपासून नक्षल्यांच्या पीपल्स गुर्रिल्ला आर्मीचा स्थापना सप्ताह आहे. या सप्ताहात नक्षली हिंसक कारवाया करतात. मात्र, त्याआधीच त्यांनी बस अडविल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

Mangesh PandeNaxals