विदर्भातील भिवापुरी मिरची, हळद, मोहरी, आमचूर यासारख्या मसाल्यांच्या निर्यातीकरता ब्रॅण्डिंग पॅकेजिंगची गरज- स्नेहल ढोके

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

नागपुर : केंद्रीय वाणिज्य आणि व्यापार मंत्रालय अंतर्गत नागपूरच्या परकीय व्यापार संचलनालयाच्या तसेच विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन व्हीआयएच्या वतीने ‘विदर्भ क्षेत्रातील मसाल्याची निर्यात ‘ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन नागपुरातील सिवील लाईन्स स्थित उद्योग भवनच्या विदर्भ इंडस्ट्रियल असोसिएशन सभागृहात करण्यात आले होते . या कार्यशाळेचे उद्दिष्ट शेतकरी आणि व्यापाऱ्यांना जागतिक निर्यात प्रक्रियांचे, प्रोत्साहन योजनांचे आणि सर्वोत्तम शेती पद्धतींचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन देणे होते, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश करता येईल.

भारतीय व्यापार सेवेच्या परकीय व्यापार सहाय्यक महासंचालक स्नेहल ढोके यांनी या कार्यशाळेच्या प्रास्ताविकात सांगितले की विदर्भातील भिवापुरी मिरची, हळद, मोहरी, आमचूर यासारख्या मसाल्यांच्या निर्यातीकरता ब्रॅण्डिंग पॅकेजिंग ची गरज आहे. विदर्भातील अमरावती, भंडारा, नागपूर या जिल्ह्यातील मसाला उत्पादनांची बांगलादेश अमेरिका आखाती देशात निर्यात होत असते, अ‍शी माहिती त्यांनी दिली. कोणकोणत्या देशात या मालाचे खरेदीदार आहेत याच्या माहितीकरिता स्पाइसेस बोर्डचे अधिकारी डॉ. बी. ए. गुडाडे, वैज्ञानिक-सी आणि कार्यालय प्रमुख, स्पाइसेस बोर्ड यांनी मसाला निर्यात वाढवण्यासाठी उत्पादक आणि शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारात विस्तार करण्यासाठी बोर्डाच्या उपक्रमांची माहिती दिली.

निर्यात गुणवत्तेसाठी एकात्मिक किड व्यवस्थापनवर बोलतांना डॉ. मनीष मोंडे, उपसंचालक, यांनी फळे आणि भाजीपाला निर्यातीमध्ये एकात्मिक की व्यवस्थापन कसे उपयुक्त ठरते, याची माहिती दिली. मसाल्यांना जे प्रमाणीकरण आवश्यक असते त्याबद्दल सुद्धा माहिती त्यांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून उपस्थितांना दिली. शेतकरी उत्पादक संघ -एफपीओ साठी नाबार्डचे योगदान यासंदर्भात सचिन सोनवणे, जिल्हा विकास अधिकारी यांनी शेतकरी उत्पादक संघटनांना चालना देण्यासाठी नाबार्डची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली.

सर्वोत्तम शेती पद्धती याबाबत नागपूर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ. रवींद्र मनोहरे, यांनी मसाल्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार उत्पादन करण्यासाठी आधुनिक शेती तंत्रांचा उल्लेख केला. विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन एक्स्झिम फोरमचे योगदान यावर कौशल मोहता, अध्यक्ष, व्हीआयए एक्स्झिम फोरम यांनी विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या माध्यमातून विदर्भ क्षेत्रातील निर्यातीसाठी मिळत असलेल्या सहाय्याबद्दल माहिती दिली. या कार्यशाळेत विशेषतः हळद आणि मिरची उत्पादनाशी संबंधित शेतकरी, व्यापारी, निर्यातदार आणि शेतकरी उत्पादक संघ सहभागी झाले होते.

Comments (0)
Add Comment