लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील शाळांना सुरक्षित व दर्जेदार स्वरूप मिळावे, विद्यार्थ्यांना सक्षम शैक्षणिक वातावरण लाभावे, यासाठी प्रभावी नियोजनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले. शाळा सुरक्षा समितीच्या बैठकीत त्यांनी कंपाऊंड वॉल, सिसिटिव्ही यंत्रणा, नवीन वर्गखोल्या, किचन शेड तसेच विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे उभारण्यावर विशेष भर देण्याचे निर्देश दिले.
बैठकीदरम्यान जिल्ह्यातील शाळांच्या सुरक्षेसाठी निधी, नियोजन आणि तांत्रिक उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पावसाळी भागातील शाळा अधिक सुरक्षित राहाव्यात यासाठी तांत्रिक मार्गदर्शन घेण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मंजूर निधीतून सुरू झालेली व प्रलंबित कामे यांची सविस्तर चौकशी त्यांनी केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी लोकसहभागातून शाळांमध्ये सिसिटिव्ही बसविण्याचा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. बैठकीला शिक्षणाधिकारी बाबासाहेब पवार, वासुदेव भुसे, समग्रचे कार्यकारी अभियंता रविंद्र भरडकर, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.