लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ता. २६ : गडचिरोली शहरातील वाढती वाहतूक आणि त्यातून उद्भवणाऱ्या अपघातांच्या घटनांनी गंभीर स्वरूप धारण केले आहे. रस्त्यांवरील अव्यवस्था, अकार्यक्षम सिग्नल व्यवस्था आणि अपुरी वाहतूक कर्मचारी संख्या यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहेत. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन शेतकरी कामगार पक्षाने जिल्हा पोलिस प्रशासनाकडे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्याची ठोस मागणी केली आहे.
शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते, जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे आणि आझाद समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन याबाबत सविस्तर निवेदन सादर केले. शहरातील गांधी चौकात करण्यात आलेल्या गोल सौंदर्यीकरणामुळे राष्ट्रीय महामार्गाचे नियम धाब्यावर बसवले गेले असून, त्याचा थेट परिणाम वाहतुकीच्या सुरळीततेवर होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.
सिग्नल व्यवस्था ठप्प, अपघातांना निमंत्रण…
गांधी चौकातील सिग्नल अनेकदा बंद राहत असल्याने वाहनचालक संभ्रमात पडतात. त्यातच सौंदर्यीकरणामुळे सिग्नल स्पष्ट न दिसल्याने सिग्नल सुरू आहे की नाही, हे वाहनचालकांच्या लक्षात येत नाही. परिणामी वाहने चुकीच्या वेळी रस्ता ओलांडतात आणि धडकांच्या घटना घडतात. या अपघातांवर नियंत्रण मिळवायचे असेल तर गांधी चौकातील सौंदर्यीकरण त्वरित हटवावे, अशी मागणी शेकापने केली आहे.
वाहतूक शिपायांचा अभाव आणि पक्षपाती दंडवसुलीचा आरोप..
सध्या शहरात वाहतूक शिपायांची संख्या अत्यल्प असून, जे काही कर्मचारी आहेत, ते फक्त एकाच रस्त्यावर, विशेषतः आरमोरी रोडवर चालान देण्यात गुंतलेले असतात. इतर चौकात वाहतूक नियंत्रण कोणीही करत नसल्याने अराजकता पसरली आहे. त्यामुळे गांधी चौक, जिल्हा न्यायालय चौक, आयटीआय चौक, कारगिल चौक आणि शिवाजी महाविद्यालय चौकात प्रत्येकी दोन वाहतूक शिपायांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
फक्त सामान्यांना दंड नको, अवजड वाहनांवरही कारवाई हवी..
शहरातील दुचाकी आणि चारचाकी सामान्य वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल केला जातो. परंतु त्याच वेळी अवैध प्रवासी वाहतूक करणारे ट्रॅक्स, ट्रॅव्हल्स, रेती-मुरूमाची तस्करी करणारे ट्रक व ट्रॅक्टर यांच्यावर दुर्लक्ष केले जाते, असा आरोप शेकापने केला. यांच्यावरही नियमबद्ध दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, अशी ठाम भूमिका पक्षाने मांडली आहे.
रिंग रोड व सेवा रस्त्यांची गरज अधोरेखित..
गडचिरोली शहरासाठी मूरखळा-सेमाना-माडेतुकूम-अडपल्ली असा रिंग रोड अथवा बायपास मार्ग अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होईल. तसेच शहर विकास आराखड्यानुसार सेवा रस्त्यांची आवश्यकता असल्याची आठवण करून देत, नगरपरिषद प्रशासनाने यासाठी पावले उचलावीत, अशी विनंतीही शेकापने केली.
प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद…
शेतकरी कामगार पक्षाच्या शिष्टमंडळाच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देत जिल्हा पोलिस अधीक्षक निलोत्पल यांनी येत्या पंधरा दिवसांत शहरातील वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
या मागण्यांमुळे शहरातील नागरी समस्यांना वाचा फुटली असून, प्रशासनाने आता ठोस कृती केल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच आटोक्यात येईल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.