वनातील नवप्रभात: दिपाली तलमले यांचं नेतृत्व आणि गडचिरोलीच्या ओळखीचा नवयुग

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

ओमप्रकाश चुनारकर,

संपादकीय

जिथे निसर्गाचा श्वास घनदाट वृक्षराजीच्या पानांमधून उमटतो, जिथे जंगल ही फक्त जमीन नव्हे तर संस्कृती असते, तिथे एक महिला अधिकारी पदभार स्वीकारते म्हणजे ती केवळ कामकाजाची जबाबदारी घेत नाही, तर ती त्या भूमीच्या काळजाशी जुळते. उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांची आलापल्लीच्या वन विभागात नुकतीच झालेली नियुक्ती ही अशाच एका काळजाच्या ठोक्याशी जुळलेली आशेची नवी लय आहे.

अकोला येथे जन्मलेली, नागपूर येथे घडलेली, चंद्रपूरच्या व्याघ्र प्रकल्पात अनुभवलेली आणि जैवविविधतेच्या संकल्पनांतून फुललेली ही प्रशासकीय वाटचाल गडचिरोलीच्या धगधगत्या मातीत एक वेगळा श्वास देण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘ग्लोरी ऑफ फॉरेस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आलापल्लीच्या घनदाट जंगलांमध्ये आज विकास आणि संवर्धन यांच्या दरम्यान एक नवसंवाद घडवायची संधी आहे आणि त्या संवादाचा चेहरा दिपाली तलमले आहेत. एक महिला अधिकारी म्हणून या भूमीत काम करणं म्हणजे जंगलाचा कायदा पाळण्यासोबत जंगलातील माणसांची भाषा समजून घेण्याची जबाबदारी; आणि हे करताना संवेदनशीलता आणि शिस्त यांचा समतोल राखणं हीच त्यांची खरी परीक्षा ठरणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीबाबत ‘ही जिल्हा आता महाराष्ट्रात विकासाचं प्रतीक ठरेल’ अशी घोषणा नुकतीच केली आहे, तर दुसरीकडे सुरजागडसारख्या लोहखनिज प्रकल्पांपासून जिल्ह्यात अनेक मोठे उद्योग उभे राहत आहेत. रोजगाराच्या नव्या संधी, खाणी, सिमेंट फॅक्टऱ्या, औद्योगिक गावे – हे सगळं आता गडचिरोलीच्या भविष्यात रेखाटलं जातंय, पण याच वेळी जंगलातल्या मुळाशी असलेली आदिवासी संस्कृती, स्थानिकांचे हक्क आणि निसर्गाचं संतुलन यांचं जपणं ही एक समांतर जबाबदारी आहे.

नुकत्याच सिरोंच्यातील महिला उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्यावर आलेल्या प्रशासनिक अडचणींनी या विभागात काम करणाऱ्या महिलांसमोर किती व्यावसायिक आणि मानसिक आव्हानं उभी राहतात याचा प्रत्यय दिला, आणि अशा परिस्थितीत दिपाली तलमले यांचं येणं म्हणजे विश्वासाचं नवसंकेतक ठरू शकतं.

आलापल्लीसारख्या अतिसंवेदनशील, नक्षलग्रस्त, आदिवासीबहुल भागात जबाबदारी पार पाडताना त्यांच्या अनुभवानं आणि व्यक्तिमत्त्वानं या जिल्ह्याला केवळ सुरक्षा नव्हे, तर संधी आणि सन्मानाची नवी दिशा मिळू शकते. जंगल हे केवळ कार्बन क्रेडिटचं साधन नाही, ते आदिवासींचं आयुष्य, त्यांची अर्थव्यवस्था आणि ओळख आहे; आणि म्हणूनच महिला नेतृत्वातूनच समावेशक, संवेदनशील आणि संवादशील प्रशासनाची गरज असते. दिपाली तलमले यांचं प्रशासन हे केवळ कागदोपत्री नव्हे, तर त्या प्रत्येक पानावर उमटणाऱ्या हाकांना प्रतिसाद देणारं, त्या प्रत्येक झाडाच्या सावलीत वावरणाऱ्या महिलांशी मैत्री करू पाहणारं, आणि त्या प्रत्येक कत्तल झालेल्या झाडासोबत नवसंवर्धनाची आशा बाळगणारं असावं अशी अपेक्षा आहे.

गडचिरोली जिल्हा सध्या औद्योगिकरणाच्या उंबरठ्यावर उभा आहे – इथे शाश्वत विकासाच्या संकल्पना आणि निसर्ग हक्कांच्या वादात एक नवीन समतोल शोधला जात आहे, आणि त्या शोधात दिपाली तलमले यांचं योगदान हे सामाजिक, नैतिक आणि भावनिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. महिला अधिकारी म्हणून त्यांचं हे नेतृत्व भविष्यात गडचिरोली जिल्ह्यासाठी एक प्रेरणास्त्रोत ठरेल आणि या अरण्यातून विकासाच्या नवप्रभाताची वाट निघेल अशी आशा आहे.

Allapali DFO talmaleAllapali forest departmentNew DFO of allapaliदीपाली तलमले