लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगरपरिषदेच्या राजकारणात केवळ सत्तांतर नव्हे, तर कारभाराच्या दिशेचा बदल सूचित करणारा क्षण म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्षा अँड. सौ. प्रणोती सागर निंबोरकर यांच्या पदग्रहणाकडे पाहिले जात आहे. नगरपरिषद कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेला हा पदग्रहण सोहळा उत्साह, विश्वास आणि विकासाभिमुख अपेक्षांनी भारलेला होता.
या सोहळ्यास माजी खासदार व भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी उपस्थित राहून नवनिर्वाचित नगराध्यक्षा यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा केवळ औपचारिक न राहता राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण संदेश देणारा ठरला.
नगरपरिषद गेटपासून सभागृहापर्यंत ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी आणि औक्षण करत करण्यात आलेले स्वागत हे लोकांच्या अपेक्षांचे प्रतीक होते. नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत संपूर्ण परिसरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते.
पदभार स्वीकारल्यानंतर अँड. प्रणोती निंबोरकर यांनी स्वच्छता, पायाभूत सुविधा, नागरी सोयी-सुविधा, पारदर्शक प्रशासन आणि लोकाभिमुख निर्णय यांना प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले. कायद्याची जाण आणि प्रशासनाचा अनुभव यांच्या आधारे नगरपरिषदेचा कारभार अधिक गतिमान, उत्तरदायी आणि पारदर्शक करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल, दुर्गम आणि विकासाच्या अनेक पातळ्यांवर संघर्ष करणाऱ्या शहरासाठी नगराध्यक्षपद हे केवळ पद नसून लोकांच्या अपेक्षांचे केंद्र आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, बाजारपेठा आणि शहर नियोजन यासारख्या प्रश्नांवर नव्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे.
या पदग्रहण सोहळ्यास आमदार कीर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडिया, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी आमदार डॉ. देवराव होळी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महिला मोर्चाचे प्रतिनिधी आणि शहरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विविध पक्षांची उपस्थिती ही शहराच्या विकासासाठी राजकीय समन्वयाची अपेक्षा व्यक्त करणारी ठरली.
एकूणच, अँड. प्रणोती निंबोरकर यांचे पदग्रहण हे गडचिरोलीच्या नगरकारभारातील नवा अध्याय मानले जात आहे. आता घोषणांच्या पुढे जाऊन प्रत्यक्ष विकासकामे, पारदर्शक निर्णय आणि नागरिकांचा विश्वास टिकवणारा कारभार होतो का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.