लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: आष्टी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने श्री सद्गुरू साईबाबा विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आष्टी येथे “एक पृथ्वी, एक आरोग्य” या वैश्विक संदेशाच्या पार्श्वभूमीवर योगसाधनेचा उत्सव साजरा करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्थेच्या व्यवस्थापनाखालील या महाविद्यालयात योगाच्या महत्वपूर्ण तत्त्वांचा अनुभव देणारा हा उपक्रम शारीरिक शिक्षण विभाग व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांसह शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सामूहिकरित्या विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यानसत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. आसनांच्या तालावर श्वासांच्या लयीत साधलेला आत्मानुशासनाचा अनुभव साऱ्यांना अंतर्मुख करणारा ठरला. या सत्राच्या माध्यमातून केवळ शरीर नव्हे तर मनशुद्धीचा मार्गही योगाच्या अभ्यासातून खुला होतो, हे उपस्थितांनी प्रत्यक्ष अनुभवलं.
महाविद्यालयाचे क्रीडा विभागप्रमुख डॉ. प्रदीप कश्यप यांनी योगशास्त्राचे शास्त्रीय व जीवनोपयोगी पैलू उपस्थितांसमोर उलगडले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “योग ही केवळ शारीरिक व्यायामपद्धती नसून, ती जीवनाची एक समतोल साधणारी शैली आहे. आजच्या तणावपूर्ण वातावरणात योग ही मानसिक शांती व एकाग्रतेसाठी प्रभावी साधना आहे.” त्यांनी विद्यार्थ्यांना व उपस्थित कर्मचाऱ्यांना दररोज योगाभ्यास करण्याचे आवाहन करत, निरोगी आयुष्यासाठी स्व-अनुशासनाची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. डी. एम. माटे होते. त्यांनी आपल्या विचारमंथनात सांगितले की, “आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. अशा स्थितीत योग हाच आपल्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्याचा खरा स्तंभ ठरतो.” त्यांनी योगाच्या सातत्यपूर्ण अभ्यासातून विद्यार्थ्यांमध्ये जीवनानुशासन आणि सकारात्मकता निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला.
या उपक्रमात महाविद्यालयातील विविध विभागांचे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसह अनेक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. योगसत्रामुळे संपूर्ण वातावरण सकारात्मकतेने भारले गेले. शारीरिक आरोग्याच्या पलीकडे जाऊन मानसिक एकाग्रता, अंतर्बोध, आणि सुदृढ समाजनिर्मितीचा ध्यास निर्माण करणारी ही उपक्रमश्रृंखला नवचैतन्याचे बीज रोवणारी ठरली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रा. सुबोध साखरे (NSS कार्यक्रम अधिकारी) यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आभारप्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी सहभागी सर्व शिक्षकवृंद, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विशेषतः महाविद्यालयातील डॉ. अपर्णा मारगोणवार, डॉ. एम. पी. सिंग, डॉ. पी. के. सिंग, डॉ. सोनाली ढवस, डॉ. दीपक नागापुरे, प्रा. महेशकुमार सिलमवार, प्रा. सचिन मुरकुटे, प्रा. राहुल आवारी, प्रा. कवींद्र साखरे, प्रा. जया रोकडे, रवींद्र झाडे, संदीप मानापुरे, सविता गारघाटे, शुभांगी डोंगरे, विजय खोब्रागडे, अविनाश जीवतोडे, रमेश वागदरकर, पोर्णिमा गोहने या सर्वांनी सहकार्याची भूमिका पार पाडली.
योग दिनाचे हे आयोजन केवळ एक दिवसापुरते न ठरता, जीवनशैलीचा अंगभूत भाग व्हावा यासाठी महाविद्यालयाने घेतलेला पुढाकार ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ या संकल्पनेला सुसंगत असा विचारमूल्यांचा योगमंत्रच ठरला.