लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेला नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनाने धानोरा तालुक्यातील चातगांव येथे नवीन पोलीस ठाण्याची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून या ठाण्याचे काम पूर्ण झाले असून, यासाठी शासनाने तब्बल ११० नव्या पदांच्या निर्मितीस मान्यता दिली आहे.
जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त प्रतिमेला मागे सारून, शांतता, विकास आणि विश्वासाचे नवे पर्व सुरू करण्याच्या उद्देशाने गडचिरोलीत पोलिस दलाची संरचना अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. चातगांव येथे उभारलेले हे पोलीस ठाणे त्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
या नव्या ठाण्याचे औपचारिक उद्घाटन १४ नोव्हेंबर रोजी होणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांनी दिली. चातगांव परिसरातील ५० हून अधिक गावे या ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येतात. भौगोलिकदृष्ट्या नक्षल कारवायांसाठी संवेदनशील समजल्या जाणाऱ्या या भागात गस्त, गुप्त माहिती संकलन आणि तातडीच्या प्रतिसादक्षमता वाढविण्यासाठी हे ठाणे महत्त्वाची भूमिका बजावेल, असेही त्यांनी सांगितले.
नवीन ठाण्यामुळे नागरिकांना न्याय व सुरक्षा सेवांचा तात्काळ आणि स्थानिक स्तरावर लाभ मिळेल. पोलिस व जनतेमधील संवाद वाढवून परस्पर विश्वास आणि सहकार्याचे वातावरण निर्माण करण्यास ही उभारणी हातभार लावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याचा विकास आणि सुरक्षा या दोन्ही आघाड्यांवर राज्य शासनाने घेतलेली ही एक दूरदर्शी पावले ठरतील, असा सर्वसामान्यांचा विश्वास आहे.