लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ३ जून – “जिल्हा क्रीडा संकुलातील कामे केवळ वेळेत नव्हे, तर दर्जेदार आणि दीर्घकालीन उपयोगात येणारी असली पाहिजेत,” असा ठाम संदेश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला. क्रीडा संकुलाच्या प्रगतीचा आढावा घेत असताना त्यांनी कामांच्या गुणवत्तेवर विशेष भर दिला आणि संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या.
जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या आढावा बैठकीदरम्यान पंडा यांनी संकुलातील प्रशासकीय इमारत, अत्याधुनिक व्यायामशाळा, इनडोअर बॅडमिंटन हॉल, जलतरण टाकी आणि डोम टाईप मल्टीगेम हॉल यांसारख्या विविध कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, सहाय्यक जिल्हाधिकारी रणजित यादव, जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दरम्यान, पंडा यांनी इनडोअर हॉलमधील हवेचे वहन (व्हेंटीलेशन), खेळाडूंना आवश्यक असलेल्या सुविधा आणि बांधकामाच्या अंतिम टप्प्यातील अडचणी यावर सखोल चर्चा केली. “क्रीडा क्षेत्रातील उदयोन्मुख खेळाडूंना सर्वोत्तम सुविधा देणे ही आपली जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.तसेच, संकुलातील कामे पुढील १५ दिवसांत पूर्ण करून गुणवत्ता अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले.ही सर्व कामे गडचिरोली जिल्ह्याच्या क्रीडा पायाभूत सुविधांसाठी मैलाचा दगड ठरणार आहेत, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.