लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली 16 जुलै :- गोंडवाना विद्यापीठाने ग्रीन-कॅम्पस चळवळीचा एक भाग म्हणून महिन्याचा पहिला शनिवार, तिसरा शनिवार आणि पाचव्या शनिवारी विद्यापीठ परिसरात वाहनविरहित दिवस असेल असे गोंडवाना विद्यापीठाने ठरविले आहे. शनिवारी महाविद्यालयात जाण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी सार्वजनिक वाहतूक आणि सायकलींचा वापर केला. “पर्यावरणाचे संतुलन राखण्यास पूरक भाग म्हणून हवा प्रदूषण कमी होण्यास हातभार लावण्याच्या दृष्टीने तसेच आरोग्याच्या दृष्टीने, नो व्हेईकल डे असावा हा यामागचा उद्देश आहे, असे कुलगुरू डॉ. प्रशांत श्री. बोकारे यांनी सांगितले. प्रत्येक महिन्याचा पहिला शनिवार, तिसरा शनिवार व पाचवा शनिवार ‘नो व्हेकल डे’ पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
झाडे लावा झाडे जगवा हे वाक्य आपण नेहमी ऐकतो . पण वातावरणातील वायू प्रदूषणावर काही प्रमाणात का होईना मात करता यावी म्हणून ‘नो व्हेईकल डे’ पाळायला आज पासून सुरुवात झाली आहे. त्यानुषंगाने विद्यापीठातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी आपल्या निवासस्थानापासून सायकलवर तर काहीनी पायी येत ‘नो व्हेईकल डे’ चा विद्यापीठात सुरू केलेला उपक्रम चांगला असल्याचे मत व्यक्त केले.