“उद्योगपती नव्हे, देवदूतच! — लॉईड्स मेटल्सकडून अपघातातील जखमींसाठी हेलिकॉप्टर सेवा”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : आरमोरी-गडचिरोली महामार्गावर चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या भीषण अपघातानंतर, दोन गंभीर जखमी तरुणांसाठी लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडने दाखवलेली तत्परता आणि माणुसकीची जाणीव संपूर्ण जिल्ह्यासाठी एक आदर्श ठरली आहे. अपघाताच्या काही तासांतच नागपूर येथे तातडीच्या उपचारासाठी या जखमींना पोहचवण्यासाठी कंपनीने स्वतःचे खासगी हेलिकॉप्टर विनाशुल्क उपलब्ध करून दिले. यामुळे वेळेवर वैद्यकीय मदत मिळाल्याने या दोन जखमींच्या जीवाला संजीवनी मिळाली आहे.

आज सकाळी आरमोरी-गडचिरोली मार्गावरील एका अज्ञात वाहनाच्या धडकेत सहा युवकांना जबर अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की चार तरुणांनी जागीच प्राण सोडले. उरलेले दोन तरुण गंभीर अवस्थेत गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांची प्रकृती अतिशय नाजूक असल्यामुळे त्यांना तातडीने नागपूर येथे हलविण्याची गरज भासली. अशा अत्यवस्थ वेळी हेलिकॉप्टर द्वारे उपचारासाठी नागपूरला पाठवण्याची आवश्यकता निर्माण झाली होती. ही बाब लॉईड्स मेटल्सपर्यंत पोहचताच कंपनीने कोणताही वेळ न दवडता स्वतःचे खासगी हेलिकॉप्टर जखमींसाठी उपलब्ध करून दिले. कंपनीकडून दाखवण्यात आलेली ही तत्परता ही केवळ सामाजिक बांधिलकी नव्हे, तर एका मोठ्या उद्योगसमूहाने घेतलेली माणुसकीची जबाबदारी होती.

या आधीही लॉईड्स मेटल्सने याच प्रकारची मदत करून एक जीव वाचवला होता. २ ऑगस्ट रोजी हेडरी येथे हृदयविकाराचा झटका आलेल्या पोलीस नाईक राहुल गायकवाड यांना कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांनी स्वतःच्या हेलिकॉप्टरमधून नागपूर येथे हलवून वेळेवर उपचार मिळवून दिला होता. आणि आज पुन्हा एका सामान्य कुटुंबातील दोन तरुणांसाठी असेच पाऊल उचलून, कंपनीने ‘उद्योगपती’ म्हणून नव्हे, तर ‘उत्तरदायी नागरिक’ म्हणून भूमिका बजावली आहे.

गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्ह्यात, जिथे वैद्यकीय सेवा वेळेत मिळणेही मोठं आव्हान ठरते, तिथे एखाद्या कंपनीकडून हेलिकॉप्टरची सुविधा करून देणे ही गोष्ट लोकांसाठी आश्चर्यकारक तर ठरलीच, पण त्याहीपेक्षा मोलाची गोष्ट म्हणजे यामागची संवेदनशीलता. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील या जखमी तरुणांसाठी असा अवघड आणि खर्चिक पर्याय देणं, हे त्यांच्या कुटुंबीयांसाठी केवळ मदत नव्हे, तर देवदूताचीच अनुभूती ठरली.

या घटनेमुळे सामाजिक माध्यमांवर आणि जिल्ह्यातील विविध स्तरांमधून लॉईड्स मेटल्सच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे. केवळ व्यवसाय वाढवण्याच्या ध्येयाने उद्योग चालवणाऱ्या काळात, सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत प्रत्यक्ष कृती करणारे उद्योगसमूह हे दुर्मीळ होत चालले असताना, लॉईड्स मेटल्सचा हा मानवीतेचा प्रत्यय देणारा निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

वास्तविक पाहता, अपघात ही एक अनपेक्षित घटना असली तरी त्यानंतर मिळणारी मदत ही नियतीपेक्षाही मोठी ठरते. त्या मदतीत जर वेळ, साधनसामग्री आणि मानवी भावना यांचा समतोल साधला गेला, तर अनेक प्राण वाचू शकतात. आणि आजच्या घटनेत लॉईड्स मेटल्सने हे सप्रमाण सिद्ध केले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अशा प्रकारे मदतीचा हात पुढे करणाऱ्या संस्था, उद्योगसमूहांची नितांत गरज आहे. जखमी तरुणांचे जीव वाचवण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवणं ही बाब त्या तरुणांसाठी आयुष्यभर लक्षात राहणारी ठरणार आहे. या संवेदनशीलतेमुळे एक औद्योगिक कंपनी, जिल्ह्यातील सामान्य नागरिकांच्या नजरेत एक आपली संस्था म्हणून उभी राहत आहे, हीच खऱ्या अर्थाने मोठी गोष्ट आहे.