लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अधिनस्त परिचारिकेला वेतनवाढ रोखण्याची धमकी देत लैंगिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप जिल्ह्यातील एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. या सततच्या छळामुळे मानसिक तणावात आलेल्या परिचारिकेने ६ डिसेंबर रोजी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. सध्या तिच्यावर गडचिरोली येथे उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले.
प्राप्त माहितीनुसार, संबंधित परिचारिकेच्या पतीने दिलेल्या निवेदनात, मागील दोन वर्षांपासून त्या वैद्यकीय अधिकाऱ्याकडून पत्नीवर लैंगिक अत्याचाराची मागणी, मानसिक छळ आणि वेतनवाढ रोखण्याचा दबाव टाकला जात असल्याचा उल्लेख आहे. सातत्याने सुरू असलेल्या या छळामुळे त्रस्त झालेल्या परिचारिकेने ६ डिसेंबरच्या रात्री पती झोपल्यानंतर विषारी द्रव प्राशन केले. वेळेत हे लक्षात आल्यानंतर पतीने तिला मुलचेरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारांसाठी गडचिरोली जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
या प्रकरणी अद्याप प्रशासकीय स्तरावर कारवाई झालेली नाही. मात्र, परिचारिकेची तब्येत सुधारत असून तिचे अधिकृत बयान नोंदवल्यानंतर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध पुढील कार्यवाही होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. घटनेमुळे आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.