खनिज प्रतिष्ठान निधीतून क्षयरुग्णांसाठी पोषण सुरक्षा; गडचिरोलीत अभिनव उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, : खनिज क्षेत्रात कार्यरत असलेल्या क्षयरोगग्रस्त रुग्णांच्या उपचारांना पोषणाची भक्कम जोड देण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालय आणि ‘उमेद’ (एकात्मिक ग्रामीण विकास प्रकल्प) यांच्यात आज महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत संबंधित क्षयरोग रुग्णांना दररोज पोषणमूल्यांनी समृद्ध ‘फूड बास्केट’ पुरविण्यात येणार असून हा उपक्रम पुढील तीन वर्षांसाठी लागू राहणार आहे.

या अभिनव उपक्रमाची अंमलबजावणी ‘कोया जंगम’ महिला शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या फूड बास्केट पुरवठ्यासाठी होणारा संपूर्ण खर्च जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून केला जाणार असल्याने रुग्णांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.

जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्या उपस्थितीत हा सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन हेमके, ‘उमेद’चे प्रकल्प अधिकारी राहुल काळभोर, ‘कोया जंगम’ महिला शेतकरी उत्पादन कंपनीच्या संचालिका संध्या गेडाम व सुनीता शेंडे, तसेच खनिज प्रतिष्ठानचे प्रतिनिधी डॉ. तारीक उपस्थित होते.

या फूड बास्केटमध्ये धान्ये, ज्वारी-भाजरीसारखी भरड धान्ये, विविध डाळी, वनस्पतीजन्य खाद्यतेल, दूध व दुधाची भुकटी, भुईमूग, अंडी आदी पोषणमूल्यांनी समृद्ध साहित्याचा समावेश राहणार आहे. उपचारांसोबत पुरेसे पोषण मिळाल्यास क्षयरोगावरील प्रतिकारशक्ती वाढते, उपचारांचा कालावधी कमी होतो आणि रुग्ण बरे होण्याचा वेग वाढतो, या वैज्ञानिक तत्त्वावर आधारित हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या योजनेमुळे केवळ क्षयरोग रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार नाही, तर महिला शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत पुरवठा केल्याने महिला सक्षमीकरण, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे. आरोग्य, पोषण आणि सामाजिक विकास यांचा समन्वय साधणारा हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यासाठी एक आदर्श मॉडेल ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

TB
Comments (0)
Add Comment