लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १३ : भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाचा मुख्य सोहळा साजरा होईल.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित या मुख्य शासकीय कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवर अधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, विविध विभागांचे कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील. कार्यक्रमस्थळी सुरक्षा, वाहतूक, आसन व्यवस्था व इतर सर्व सोयी-सुविधांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या सोहळ्याद्वारे स्वातंत्र्याच्या अमर वीरांना अभिवादन, संविधानिक मूल्यांचा सन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्हावासीयांना या मुख्य शासकीय कार्यक्रमात सहभागी होऊन स्वातंत्र्यदिनाचा उत्सव अभिमानाने साजरा करण्याचे आवाहन केले आहे.