लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, 02 सप्टेंबर : अहेरी तालुक्यात मुबलक प्रमाणात वनसंपदा असतांना केवळ वनविभागातील अधिकारी व कर्मचा-यांद्वारे मुख्यालयी अनुपस्थितीमुळे तसेच कर्तव्य निष्ठुरतेमुळे तालुक्यातील ही वनसंपदा नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. याकडे वरिष्ठ वनाधिका-यांनीही कानाडोळा केला जात असल्याने त्यांच्या अनास्थेमुळे या वन कर्मचा-यांचे चांगलेच फावले असल्याचा थेट आरोप जनकल्याण समाजोन्नती अन्याय, भ्रष्टाचार निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी पत्रकातून केला आहे.
सदर दोन्ही वनपरिक्षेत्राअंतर्गत दोन वनपरिक्षेत्राधिकारी 8 वनपाल व 40 वनरक्षक कार्यरत आहेत. मात्र या वरिष्ठ वनाधिका-यांसह वनकर्मचारी मुख्यालयी वास्तव्याने न राहता बाहेरुन अपडाऊन करीत कर्तव्य बजावित आहेत. याचा थेट परिणाम वनसंपदेवर पडत आहे. मुख्यालयी वास्तव्याने नसल्यामुळे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन, वृक्षांची कत्तल केली जात आहे. परिणामी मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होण्याची भीती व्यक्त होत आहे. सदर कर्मचारी मुख्यालयी न राहता शासनाच्या वेतनासह विविध भत्यांची उचल करीत आहेत.
सदर कर्मचा-यांकडून शासनाची शुद्ध फसवणूक केली जात असतांना वरिष्ठ अधिका-यांनीही याकडे डोळेझाक केल्याचे दिसून येत आहे. उपवनसंरक्षक सुमित कुमार व उपविभागीय वनाधिकारी यांनी पदभार स्विकारल्यापासून अवैध उत्खननात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
या वरिष्ठ अधिका-यांचे वनविभागांतर्गत कार्यरत असलेल्या वनकर्मचा-यांवर कोणताच जरब नसल्यानेच वनकर्मचारी मनमर्जीने काम करीत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या वरिष्ठ अधिका-यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या दोषी कर्मचा-यांवर कठोर कारवाई करावी, असेही संतोष ताटीकोंडावार यांनी पत्रकात म्हटले आहे.
हे देखील वाचा :
गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून भव्य ‘स्वयंरोजगार मेळावा’ संपन्न