ध्वजनिधीत ८८ वर्षीय महिलेची एक लाखाची मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नागपूर, दि. १७ डिसेंबर : देशाच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी असलेल्या ध्वजनिधीत योगदान देण्यासाठी ८८ वर्षीय लीला विद्याधर भावे यांचे हात पुढे सरसावले. थोडी – थोडकी नव्हे तर तब्बल एक लाखाचा निधी त्यांनी शासनाकडे सुपुर्द केला. चार दिवसांपूर्वीच ध्वजनिधीत सहस्त्रभोजनी दांपत्याने एक लाखाचे योगदान दिले होते. 

 भावे या निवृत्त प्राध्यापिका असून नागपूर महानगरातील लक्ष्मी नगर परिसरात राहतात. त्यांनी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात दूरध्वनी करून सैन्यासाठी ध्वजनिधीला रक्कम द्यायची आहे, असे सांगितले. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांनी यासंदर्भात जिल्हा सैनिक  अधिकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर आज जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. जिल्हा प्रशासनातर्फे त्यांचे आभार मानून हा निधी स्वीकारला. 

लीला भावे सेवासदनच्या डी.एड. कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून सेवेत होत्या. १९९१ मध्ये त्या निवृत्त झाल्या. सध्या त्यांचे वय ८८वर्षे  आहे. नंदनवन येथील भारतीय श्रीविद्या निकेतन येथील इंद्रधनू अपंग मुलांच्या संस्थेशी देखील त्या निगडीत होत्या. याशिवाय विविध सामाजिक संस्थांशी त्या जुळल्या आहेत. आज एक लाखाचा धनादेश दिल्यानंतर त्या म्हणाल्या, “सैनिकांना वेगवेगळ्या योजनांमार्फत मदत करणे शासनाचे जसे काम आहे. तसेच सामान्य माणसाने देखील आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून त्यांना मदत करणे गरजेचे आहे. ते सीमेवर तैनात असतात म्हणून आपण शांतपणे आपले जीवन व्यतीत करू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. चार दिवसांपूर्वी वृत्तपत्रांमध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे निवृत्त संचालक ९५ वर्षीय श्रीपाद सहस्त्रभोजनी यांनी एक लक्ष रुपयाचा निधी ध्वजनिधीला दिल्याचे वृत्त आपण वाचले. या वृत्तामुळे आपल्याला प्रेरणा मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

योग महिला मंडळाची मदत

लक्ष्मीनगरातील फुलवारी महिला योग मंडळाने देखील ७,६०० रुपयाचा ध्वजनिधी जिल्हा सैनिक अधिकाऱ्यांना यावेळी दिला. भावे मॅडम यांच्याकडून प्रेरणा घेऊन हा ध्वज निधी देत असल्याचे त्यांनी सांगितले. या योग वर्गातील दीप्ती बापट, मनीषा घाणेकर, संगीता खजांजी, मेघना देशपांडे, वर्षा अग्निहोत्री आदी महिला सदस्य यावेळी उपस्थित होत्या.

७ डिसेंबरपासून ध्वज दिनाला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात निधी संकलनाला सुरुवात झाली आहे. सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांना याद्वारे मदत केली जाते. सामान्यातला सामान्य माणूस यासाठी मदत करू शकतो. सिव्हिल लाईन्स येथील प्रशासकीय भवन क्रमांक एक मध्ये तिसऱ्या माळ्यावर जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये ध्वजनिधीसाठी आपले योगदान दिले जाऊ शकते. या ठिकाणी आपण दिलेल्या देणगीची पावती देखील मिळते. अधिक माहितीसाठी या कार्यालयाच्या ०७१२-२५६११३३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मेजर डॉ. शिल्पा खरपकर यांनी केले आहे.