लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: भामरागड उपविभागातील अतिदुर्गम मन्नेराजाराम पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा जिजगाव येथे गडचिरोली पोलीस दलाने ‘एक गाव, एक वाचनालय’ या उपक्रमांतर्गत ७२ वे सार्वजनिक वाचनालय सुरू केले. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या हस्ते या वाचनालयाचे उद्घाटन व लोकार्पण झाले. या सोहळ्याला ५०० हून अधिक नागरिक उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सन २०२३ पासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू झालेल्या या उपक्रमाचा उद्देश म्हणजे शालेय विद्यार्थी, सुशिक्षित बेरोजगार, महिला-पुरुष यांना वाचनाची गोडी लावणे, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी अनुकूल वातावरण देणे आणि आदिवासी तरुणांना शासनाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील दुर्गम भागात ७१ वाचनालये उभारण्यात आली असून त्याचा लाभ ८००० पेक्षा अधिक युवक-युवतींनी घेतला आहे. यापैकी तब्बल २०५ विद्यार्थी शासनाच्या विविध विभागांमध्ये नोकरी मिळविण्यात यशस्वी झाले आहेत.
जिजगावमधील हे वाचनालय ग्रामस्थ, गडचिरोली पोलीस, सीआरपीएफ व एसआरपीएफच्या संयुक्त श्रमदान व लोकवर्गणीतून उभारले गेले आहे. येथे स्वतंत्र अभ्यासिका, बैठक व्यवस्था, ग्रंथसंपदा व आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वाचनालयामुळे शेकडो विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आवश्यक पायाभूत सुविधा मिळणार आहेत.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गावात ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थी व नागरिक पारंपारिक वेशभूषेत, पारंपारिक वाद्यांच्या गजरात राष्ट्रध्वज फडकवत सहभागी झाले. या दिंडीमुळे वाचन व पुस्तकांविषयी आकर्षण व सन्मानाची भावना निर्माण झाली.
उद्घाटन प्रसंगी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले, हे वाचनालय केवळ पुस्तकांचा संग्रह नसून विद्यार्थ्यांच्या भविष्याची दिशा ठरविणारे केंद्र आहे. येथून अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत यश मिळवतील अशी अपेक्षा आहे. गडचिरोली पोलीस दल केवळ माओवादी हिंसेविरुद्ध लढा देत नाही, तर नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठीही कटिबद्ध आहे.
या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) सत्य साई कार्तिक, सीआरपीएफ ए/९ बटालियनचे असिस्टंट कमांडंट अमित सिन्हा, एसआरपीएफ ग्रुप ४ नागपूरचे पोउपनि प्रशांत नरखेडे, मन्नेराजाराम पोस्टचे प्रभारी पोउपनि शुभम शिंदे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, सरपंच, पोलीस पाटील, पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अमर मोहिते, नागरी कृती शाखेचे प्रभारी पोउपनि चंद्रकांत शेळके व मन्नेराजाराम पोस्टचे अधिकारी-अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.