लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली | १९ जून – मागासवर्गीय मुला-मुलींसाठी गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय वसतीगृहांमध्ये प्रवेशासाठी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत कार्यरत या वसतीगृहांमध्ये शालेय शिक्षणापासून ते कनिष्ठ महाविद्यालय व व्यावसायिक अभ्यासक्रमांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
विद्यार्थ्यांना प्रथम https://hmas.mahait.org या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज भरावा लागणार आहे. त्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून संबंधित वसतीगृहाच्या गृहपाल कार्यालयात सादर करणे अनिवार्य आहे. “प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता व शिस्त राखण्यासाठी हा ऑनलाईन-अफलाईन एकत्रित अर्ज पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे,” असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण डॉ. सचिन मडावी यांनी सांगितले.
या वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत निवास, भोजन, निर्वाह भत्ता तसेच आवश्यक त्या सर्व शैक्षणिक सुविधा दिल्या जातात. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेऊन विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील रामनगर, विसापुर रोड, गुणवंत (मुलांचे) तसेच अहेरी, आरमोरी, नवेगाव व चामोर्शी येथील शासकीय वसतीगृहांमध्ये ही प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.