लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई, दि. १४ : परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी. आता तेच जागतिक दर्जाचे शिक्षण भारतात, तेही महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (NEP) पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पाच नामवंत आंतरराष्ट्रीय विद्यापीठांना आशयपत्र (Letter of Intent – LoI) प्रदान करण्यात आले.
मुंबईतील ताज हॉटेल येथे झालेल्या “मुंबई रायझिंग : क्रिएटिंग अॅन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या कार्यक्रमात युनिव्हर्सिटी ऑफ अॅबरडीन (स्कॉटलंड), यॉर्क युनिव्हर्सिटी (यूके), वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया), इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (अमेरिका) आणि इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (इटली) या पाच विद्यापीठांशी राज्य शासनाने करार केला.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार आहे. नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात या विद्यापीठांचे कॅम्पस उभे राहतील. येत्या काही वर्षांत या परिसरात मेडिसिटी, स्पोर्ट्स सिटी आणि इनोव्हेशन सिटी उभारण्याची देखील योजना आहे. पुढील टप्प्यात १० विद्यापीठे एकत्र आणण्याची संकल्पनाही कार्यान्वित होईल.”
यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय शिक्षण सचिव विनित जोशी, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, तसेच विविध परदेशी विद्यापीठांचे प्रतिनिधी व कौंसल जनरल उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे शिक्षण परदेशात न जाता देशातच: मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “विद्यापीठे, संशोधन संस्था, पायाभूत सुविधा आणि आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीच्या माध्यमातून महाराष्ट्र देशातील पहिले इंटरनॅशनल एज्युकेशन हब ठरणार आहे. अटल सेतूसारखी वाहतूक व्यवस्था आणि नवी मुंबई विमानतळामुळे जागतिक स्तरावरील विद्यार्थ्यांनाही येथे आकर्षित करता येईल. यामुळे केवळ शिक्षण नव्हे, तर नोकरी, संशोधन आणि उद्योगांच्या संधी देखील वाढतील.”
केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे मत: केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, “मुंबई ही आर्थिक राजधानी असून आता ती शैक्षणिक केंद्रदेखील ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. नव्या शैक्षणिक धोरणामुळे भारतीय विद्यापीठे परदेशात शाखा उघडू शकतात, तर परदेशी विद्यापीठे भारतात येऊ शकतात. त्यामुळे आता जागतिक दर्जाचे शिक्षण भारतात कमी खर्चात मिळणार आहे.”
या पाच विद्यापीठांमुळे काय मिळणार?
➤ युनिव्हर्सिटी ऑफ अॅबरडीन (स्कॉटलंड):भारताशी तीन दशकांपासून संशोधन व सहकार्य असलेल्या या विद्यापीठाचे IIT, AIIMS, ICAR, ICMR यांसारख्या संस्थांशी आधीपासून सहकार्य आहे.
➤ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटी (ऑस्ट्रेलिया): ऑस्ट्रेलियातील Go8 ग्रुपमधील प्रमुख विद्यापीठ. विज्ञान, अभियांत्रिकी, औद्योगिक कौशल्ये (STEM) यामध्ये उच्च दर्जाचे अभ्यासक्रम उपलब्ध.
➤ यॉर्क युनिव्हर्सिटी (UK): रसेल ग्रुपचा भाग. AI, सायबर सुरक्षा, सर्जनशील उद्योग यासारख्या क्षेत्रांत जागतिक कंपन्यांच्या सहकार्याने अभ्यासक्रम.
➤ इलिनॉय इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (USA): भारतात कॅम्पस स्थापन करणारे पहिले अमेरिकन विद्यापीठ. इंटर्नशिप, संशोधनासाठी ELLEVATE प्रोग्राम.
➤ इस्तितुतो यूरोपीओ दी डिझाईन (IED – इटली):फॅशन, व्हिज्युअल कम्युनिकेशन व प्रॉडक्ट डिझाईनमध्ये जागतिक दर्जाचे शिक्षण.